मलाखी 2

2
याजकांना अतिरिक्त इशारा
1“आणि आता, अहो याजकांनो ऐका, हा सावधानतेचा इशारा तुमच्याकरिता आहे. 2जर तुम्ही ऐकले नाही आणि माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवेन आणि तुमच्या आशीर्वादास शाप देईन. होय, मी ते आधीच शापित केले आहेत, कारण तुम्ही माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
3“हे लक्षात ठेवा की मी तुमच्या मुलांना धमकावेन#2:3 किंवा धान्यावर रोग आणेन आणि तुम्ही मला सणासाठी अर्पण म्हणून आणलेल्या पशूंची विष्ठा मी तुमच्या मुखांना फाशीन आणि तुम्हाला तसेच जाऊ देईन. 4आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. 5“माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले. 6सत्याचे शिक्षण त्याच्या मुखात होते व त्याच्या जिभेवर काहीही असत्य असे नव्हते. तो माझ्यासह शांती व नीतिमत्तेत चालला आणि त्याने अनेकांना त्यांच्या पापी जीवनापासून वळविले.
7“याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात. 8पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. 9“म्हणून सर्व लोकांच्या दृष्टीने मी तुम्हाला तिरस्करणीय व तुच्छ केले आहे; कारण तुम्ही स्वतः माझे मार्ग अनुसरले नाहीतच, पण कायद्याबाबत तुम्ही पक्षपात केला.”
घटस्फोटाद्वारे करार मोडणे
10आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो?
11यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे. 12ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको.
13दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत. 14तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला.
15तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका.
16याहवेह इस्राएलाचे परमेश्वर म्हणतात, “जिला संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य आहे, तिच्याविरुद्ध तो हिंसाचार करतो,#2:16 किंवा याहवेह म्हणतात, “मला घटस्फोटाचा वीट आहे, कारण जो मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तो आपली वस्त्रे हिंसेने झाकतो” तिचा तो तिरस्कार करतो व तिला घटस्फोट देतो.”
म्हणून सावध राहा व विश्वासघात करू नका.
अन्याय करून करार मोडणे
17तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे.
पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?”
असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?”

Արդեն Ընտրված.

मलाखी 2: MRCV

Ընդգծել

Կիսվել

Պատճենել

None

Ցանկանու՞մ եք պահպանել ձեր նշումները ձեր բոլոր սարքերում: Գրանցվեք կամ մուտք գործեք