योहान 5

5
बेथेस्दा तळ्याजवळचा पंगू मनुष्य
1ह्यानंतर यहुदी लोकांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमला गेला. 2यरुशलेममध्ये मेंढरे नावाच्या फाटकाजवळ एक तलाव आहे. त्याला हिब्रू भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याला लागून पाच पडव्या आहेत. 3[त्यांमध्ये रोगी, आंधळे, पांगळे आणि लुळे ह्यांचा मोठा समुदाय असे. ते पाणी ढवळण्याची वाट पाहत असत; 4कारण देवदूत वेळोवेळी तलावात उतरून पाणी ढवळत असे आणि पाणी ढवळल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला, तरी तो बरा होत असे.] 5तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक माणूस होता. 6येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे, हे ओळखून त्याला म्हटले, “तुझी बरे होण्याची इच्छा आहे काय?”
7त्या रुग्णाने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी ढवळते तेव्हा मला तलावात सोडायला माझा कोणी माणूस नसतो. मी जातो न जातो तोच दुसरा कोणी तरी माझ्या आधी उतरतो.”
8येशू त्याला म्हणाला, “ऊठ, तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.” 9लगेच तो माणूस बरा झाला व त्याचे अंथरुण उचलून चालू लागला. हे घडले तो दिवस साबाथ होता. 10ह्यावरून यहुदी लोक त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज साबाथ असल्यामुळे अंथरुण उचलणे तुझ्यासाठी कायद्याच्या विरुद्ध आहे.”
11त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले, ‘तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग.’”
12त्यांनी त्याला विचारले, “‘तुझे अंथरुण उचल आणि चालू लाग’, असे ज्याने तुला सांगितले, तो माणूस कोण आहे?”
13तो कोण आहे, हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी गर्दी होती व येशू तेथून निघून गेला होता.
14त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
15त्या माणसाने जाऊन यहुदी लोकांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.” 16त्यामुळे ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने साबाथ दिवशी हे काम केले होते. 17परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अजून काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”
18ह्यामुळे त्याला ठार मारावे म्हणून यहुदी लोक अधिकच प्रयत्न करू लागले; कारण तो साबाथ मोडत असे. इतकेच नव्हे, तर देवाला आपला पिता संबोधून स्वतःला देवासमान मानत असे.
येशू पित्यावर अवलंबून राहतो
19येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्याच्यावाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही; कारण जे काही पिता करतो, ते पुत्रही तसेच करतो; 20कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तो ह्यापेक्षा मोठ्या गोष्टी त्याला दाखवील व तुम्ही थक्क व्हाल. 21जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो, तसा पुत्रही स्वतःच्या इच्छेनुसार मेलेल्यांना जिवंत करतो. 22पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचा सर्व अधिकार त्याने पुत्राकडे सोपवला आहे. 23ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने त्याला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
24मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे. 25मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. 26ज्याप्रमाणे पित्याच्या ठायी जीवन आहे, त्याचप्रमाणे पित्याने त्याच्या पुत्राच्या ठायीदेखील जीवन दिले आहे. 27त्याला न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. 28आश्चर्य मानू नका कारण अशी वेळ येत आहे की, थडग्यांतील सर्व मृत लोक पुत्राची वाणी ऐकतील 29आणि ते उठतील - ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी.
येशूविषयी देण्यात आलेली साक्ष
30मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो, तसा मी न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले, त्याच्या इच्छेप्रमाणे करतो.
31मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही. 32माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे. जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे, हे मला ठाऊक आहे. 33तुम्ही योहानकडे माणसे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. 34मात्र मी मानवी साक्ष स्वीकारत नाही. तरी पण तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. 35योहान तेवत राहणारा व प्रकाश देणारा दीप होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करायला तयार झालात. 36परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे, ती योहानच्या साक्षीपेक्षा अधिक प्रभावी आहे. जी कार्ये पूर्ण करायचे पित्याने माझ्यावर सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे. 37शिवाय ज्या पित्याने मला पाठवले, त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे दृश्य रूप पाहिले नाही. 38तसेच त्याचे वचन तुम्ही आपल्यामध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवत नाही. 39तुम्ही धर्मशास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हांला शाश्वत जीवन प्राप्त होईल, असे तुम्हांला वाटते. ते माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. 40तरी पण शाश्वत जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुमची इच्छा नाही.
41मी माणसांकडून प्रशंसा करून घेत नाही. 42परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्यात परमेश्वराची प्रीती नाही. 43मी माझ्या पित्याच्या अधिकाराने आलो आहे, पण माझा स्वीकार तुम्ही करत नाही, दुसरा कोणी स्वतःच्या अधिकाराने आला, तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. 44जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हांला श्रद्धा ठेवता येणे कसे शक्य आहे? 45मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन, असे समजू नका. ज्याची तुम्ही आशा बाळगता, तो मोशे तुम्हांला दोष लावील. 46तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता, तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. 47परंतु जर तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा काय विश्वास ठेवाल?”

Sorotan

Berbagi

Salin

None

Ingin menyimpan sorotan di semua perangkat Anda? Daftar atau masuk