मत्तय 24

24
मंदिराचा नाश व युगाचा शेवट
1येशू मंदिरातून बाहेर पडत असता त्याचे शिष्य मंदिराच्या इमारती दाखवायला त्याच्याजवळ आले. 2येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला निक्षून सांगतो, येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की, जो पाडला जाणार नाही.”
3तो ऑलिव्ह डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे खाजगीत येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा घडतील आणि तुमच्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.”
4येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध असा.” 5पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’, असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील. 6तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी व्हायलाच हव्यात, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही. 7राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. 8हा तर वेदनांचा प्रारंभ असेल.
9तेव्हा तुमचे हाल करण्याकरता तुम्हांला धरून नेण्यात येईल व तुम्हांला ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. 10त्या वेळी पुष्कळ जण श्रद्धेपासून ढळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. 11अनेक खोटे संदेष्टे अनेकांना फसवतील. 12दुष्टपणा वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. 13परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचा उद्धार होईल. 14सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून देवराज्याच्या ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली जाईल आणि नंतर शेवट होईल.
15दानिएल संदेष्ट्याद्वारे नमूद केलेले ओसाड अमंगल दुश्‍चिन्ह पवित्र स्थानात तुम्ही पाहाल. (वाचकाने ह्याचा अर्थ समजून घ्यावा.) 16जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. 17जो छपरावर असेल, त्याने त्याच्या घरातून काही वस्तू बाहेर काढायला खाली उतरू नये. 18जो शेतात असेल त्याने त्याचे कपडे घेण्याकरता परत जाऊ नये. 19त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील व ज्या अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! 20हिवाळ्यात किंवा साबाथ दिवशी तुमची धावपळ होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 21जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आली नाही व पुढे कधीही येणार नाही, अशी भीषण आपत्ती त्या वेळी येईल. 22ते दिवस कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. परंतु निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.
23त्या वेळी जर कोणी तुम्हांला म्हणेल, “पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे’,तर ते खरे मानू नका. 24कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील. 25सावध राहा. मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे.
26कोणी तुम्हांला म्हणतील, “पाहा, तो अरण्यात आहे’, तर जाऊ नका, किंवा ‘तो एका आतील ठिकाणी लपलेला आहे’, तर ते खरे मानू नका. 27जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकत जाते, तशा प्रकारे मनुष्याचा पुत्र येईल. 28जेथे मढे, तेथे गिधाडे.
29त्या दिवसांतील संकटांनंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल. चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातल्या शक्ती डळमळतील. 30त्यानंतर मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील व ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने व महान वैभवाने येताना पाहतील. 31कर्ण्याच्या नादाबरोबर तो त्याच्या दूतांना चोहीकडे पाठवील व ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करतील.
जागृतीची आवश्यकता
32अंजिराच्या झाडापासून एक दाखला शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते. 33त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल. 34मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 35आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.
36त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्राला नाही, तर केवळ माझ्या पित्याला माहीत आहे. 37नोहाच्या दिवसांत घडले होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. 38जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत, नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुष लग्न करत होते व लग्न लावून देत होते 39आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. 40त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. 41जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैंकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.
42म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल, हे तुम्हांला ठाऊक नाही. 43परंतु कोणत्या प्रहरी चोर येईल, हे घरधन्याला कळले असते, तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. 44तर मग तुम्हीही जागृत राहा; कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
विश्वासू व दुष्ट दासांचा दाखला
45असा कोण विश्वासू व सुज्ञ दास आहे की, ज्याला त्याचा धनी त्याच्या परिवाराला योग्य वेळी भोजन देण्यासाठी नेमतो? 46त्याचा धनी येईल त्यावेळी जो दास, कार्यमग्न असलेला आढळेल, तो धन्य! 47मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्याला तो आपल्या सर्व मालमत्तेवर नेमील. 48परंतु धनी यायला विलंब लागेल, असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल 49व त्याच्या साथीदारांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल 50तर तो अपेक्षा करत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन 51धन्याची सेवा करण्याचे केवळ ढोंग करणाऱ्या दासांमध्ये त्याला हाकलून लावील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.

Sorotan

Berbagi

Salin

None

Ingin menyimpan sorotan di semua perangkat Anda? Daftar atau masuk