Logo YouVersion
Icona Cerca

लूक 11

11
प्रभूने शिकवलेली प्रार्थना
1मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता; ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.”
2तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा :
“हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र
मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे
पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.]
3आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे;
4आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण
आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो;
आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस,
[तर आम्हांला वाइटापासून सोडव.]”
आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टान्त
5मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे;
6कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’
7आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’?
8मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.
9मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.
10कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
11तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल?
12किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?
13तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”
सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करतो ह्या आरोपाला त्याने दिलेले उत्तर
14एकदा तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की, भूत निघाल्यावर मुका बोलू लागला; त्यावरून लोकसमुदायास आश्‍चर्य वाटले.
15पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो”;
16आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले.
17परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि घरावर घर पडते.
18सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता.
19पण मी जर बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील.
20परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने1 भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
21सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते;
22परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो.
23जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो.
अपुर्‍या सुधारणेपासून उद्भवणारा धोका
24मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’
25आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते.
26नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आत शिरून तेथे राहतात; मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते.”
27मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!”
28तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
चिन्ह मागण्याविषयी दिलेला इशारा
29तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.
30कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल.
31दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील; कारण शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
32निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
दिव्यावरून धडे
33दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.
34तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते.
35म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा.
36तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
परूशी व शास्त्री ह्यांचा निषेध
37तो बोलत आहे इतक्यात एका परूश्याने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली; मग तो आत जाऊन भोजनास बसला.
38त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परूश्याला आश्‍चर्य वाटले.
39परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.
40अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय?
41तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.
42परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या.
43तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते.
44अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्‍या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.”
45तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.”
46तो म्हणाला, “तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहण्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही.
47तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले!
48तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता.
49ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन, आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जिवे मारतील व कित्येकांना छळतील;
50ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त,
51म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखर्‍याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच.
52तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.”
53तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परूशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले;
54आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरून दोषी ठरवावे म्हणून ते टपून राहिले.

Attualmente Selezionati:

लूक 11: MARVBSI

Evidenziazioni

Condividi

Copia

None

Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi