लूक 2
2
येशूचा जन्म
1त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली.
2क्विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली.
3तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले.
4योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला,
5व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले.
6ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले;
7आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.
8त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते.
9तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली.
10तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो;
11ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.
12आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.”
13इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
14“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि
पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे
त्या मनुष्यांत शांती.”
15मग असे झाले की, देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू.”
16तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले.
17त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले.
18मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले.
19परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.
20नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.
21आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले; हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
मंदिरात येशूचे समर्पण
22पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’ ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे;
23(म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,)
24आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले’ ह्यांचा यज्ञ करावा.
शिमोन व त्याचे स्तोत्र
25तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.
26प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.
27त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले,
28तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांत घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले :
29“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे
आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस;
30कारण माझ्या डोळ्यांनी ‘तुझे तारण पाहिले आहे.’
31ते ‘तू सर्व राष्ट्रांसमक्ष’ सिद्ध केले आहेस.
32ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व
तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”
33त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले.
34शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले,
“पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे
होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील
असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे;
35ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील
विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या
स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)”
संदेष्ट्री हन्ना
36हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवर्याजवळ सात वर्षे राहिली होती.
37आता ती चौर्याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.
38तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.
येशूचे बाळपण
39नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नासरेथ येथे परत गेले.
40तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.
41त्याचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमेस जात असत.
42आणि तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले.
43मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही.
44तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले; नंतर नातलग व ओळखीचे ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला.
45परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमेस परत गेले.
46मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला.
47त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले.
48त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.”
49तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?”
50परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही.
51मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या.
52येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’
Attualmente Selezionati:
लूक 2: MARVBSI
Evidenziazioni
Condividi
Copia
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fit.png&w=128&q=75)
Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.