Logo YouVersion
Icona Cerca

योहान 4

4
येशू व शोमरोनी स्त्री
1येशू योहानपेक्षा अधिक शिष्य मिळवून त्यांना बाप्तिस्मा देत आहे, हे परुश्यांच्या कानी गेले आहे, असे जेव्हा प्रभूला कळले, 2(येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, पण त्याचे शिष्य देत असत.) 3तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालीलमध्ये जायला निघाला. 4त्याला शोमरोनमधून जावे लागले.
5तो शोमरोनमधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. 6तेथे याकोबची विहीर होती. प्रवासाने दमलेला येशू त्या विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
7तेथे शोमरोनची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला दे.” 8त्याचे शिष्य शिधासामग्री विकत घ्यायला नगरात गेले होते.
9ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला मागता हे कसे?” (कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत.)
10येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे वरदान म्हणजे काय, आणि ‘मला प्यायला दे’, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते, तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जीवनदायक पाणी दिले असते.”
11ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवनदायक पाणी आपल्याजवळ कुठून येणार? 12आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे ह्याच विहिरीचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण थोर आहात काय?”
13येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल, त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या ठायी शाश्‍वत जीवन देणाऱ्या पाण्याचा उसळता झरा होईल.”
15ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, ते पाणी मला द्या म्हणजे मला तहान लागणार नाही व पाणी काढायला मला येथवर यावे लागणार नाही.”
16तो तिला म्हणाला, “तू जाऊन तुझ्या पतीला बोलावून आण.”
17ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “‘मला पती नाही’, हे तू खरे बोललीस, 18तुला पाच पती होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो खरोखर तुझा पती नाही, हे तू खरे सांगितलेस!”
19ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टा आहात, हे आता मला समजले. 20आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे, ते स्थान यरुशलेम येथे आहे.”
21येशू तिला म्हणाला, “बाई, अशी वेळ येत आहे की, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाहीत, हे माझे खरे मान. 22तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता परंतु आम्हांला ठाऊक आहे, अशाची उपासना आम्ही करतो; कारण तारण यहुदी लोकांमधूनच आहे. 23मात्र खरे उपासक आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण अशा उपासकांनी त्याची उपासना करावी, हे त्याला अभिप्रेत आहे. 24देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व सत्याने केली पाहिजे.”
25ती स्त्री त्याला म्हणाली, “ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो मसिहा येणार आहे आणि तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल, हे मला ठाऊक आहे.”
26येशू तिला म्हणाला, “तुझ्याबरोबर बोलणारा मी, तो आहे.”
27इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे, ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी ‘आपल्याला काय हवे आहे’ किंवा ‘आपण कशाकरता तिच्याशी बोलत आहात’ असे कोणीही विचारले नाही.
28त्यानंतर ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, 29“चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?” 30तेव्हा ते नगरातून निघून येशूकडे आले.
31दरम्यान शिष्य त्याला विनंती करू लागले, “गुरुवर्य, जेवा.”
32परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”
33ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?”
34येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने दिलेले कार्य पूर्ण करावे, हेच माझे अन्न आहे. 35अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? परंतु मी तुम्हांला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा. पीक तयार आहे. कापणीची वेळ येऊन ठेपली आहे. 36जो मनुष्य कापणी करतो, तो मजुरी मिळवतो व शाश्वत जीवनासाठी पीक साठवतो, ह्यासाठी की, पेरणारा व कापणारा हे दोघेही आनंदित व्हावेत. 37एक पेरतो व दुसरा कापतो, अशी जी म्हण आहे, ती ह्या बाबतीत खरी आहे. 38ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते, ते कापायला मी तुम्हांला पाठवले. दुसऱ्यांनी श्रम केले आहेत व तुम्हांला त्यांच्या श्रमात सहभाग मिळत आहे.”
39“मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले”, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. 40शोमरोनी लोक त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्याकडे राहण्याची विनंती केली. तो तेथे दोन दिवस राहिला
41आणि त्याच्या संदेशावरून आणखी किती तरी लोकांनी विश्वास ठेवला. 42ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरून आम्ही विश्वास ठेवतो असे नाही, तर आम्ही स्वतः ऐकले आहे व आम्हांला समजले आहे की, हा खरोखर जगाचा तारणारा आहे.”
अधिकाऱ्याच्या मुलाला आरोग्यदान
43तेथे दोन दिवस राहिल्यानंतर येशू तेथून गालीलमध्ये निघून गेला. 44कारण येशूने स्वतः ठामपणे म्हटले होते, “संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.” 45तो गालीलमध्ये आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले. यरुशलेममध्ये सणात त्याने जे काही केले होते, ते सर्व त्यांनी पाहिले होते कारण तेदेखील सणाला गेले होते.
46नंतर तो गालीलमध्ये काना येथे पुन्हा आला. ह्याच गावी त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी एक अधिकारी होता, त्याचा मुलगा कफर्णहूम या ठिकाणी आजारी होता. 47येशू यहुदियातून गालीलमध्ये आला आहे, हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली, “आपण येऊन मरणास टेकलेल्या माझ्या मुलाला बरे करावे.” 48येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुत गोष्टी पाहिल्यावाचून विश्वास ठेवणार नाही.
49तो अधिकारी त्याला म्हणाला, “प्रभो, माझा मुलगा मरण्यापूर्वी माझ्याबरोबर येण्याची कृपा करा.”
50येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे!” तो मनुष्य येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून निघून गेला. 51तो घरी जात असता, त्याचे दास त्याला वाटेत भेटून म्हणाले, “तुमचा मुलगा वाचला आहे.”
52त्याला कोणत्या घटकेला उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल दुपारी एक वाजता त्याचा ताप उतरला.” 53ह्यावरून ज्या वेळी येशूने त्याला सांगितले होते की, ‘तुमचा मुलगा वाचला आहे’, त्याच वेळी हे झाले, हे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने येशूवर विश्वास ठेवला.
54येशूने यहुदियातून गालीलमध्ये आल्यावर केलेले हे दुसरे चिन्ह होते.

Attualmente Selezionati:

योहान 4: MACLBSI

Evidenzia

Condividi

Copia

None

Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi

Piani di Lettura e Devozionali gratuiti relativi a योहान 4

YouVersion utilizza i cookie per personalizzare la tua esperienza. Utilizzando il nostro sito Web, accetti il nostro utilizzo dei cookie come descritto nella nostra Privacy Policy