Logo YouVersion
Icona Cerca

उत्पत्ती 20

20
अब्राहाम आणि अबीमेलेख
1आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला, 2साराह आपली बहीण असल्याचे अब्राहामाने सांगितले, तेव्हा गरारचा राजा अबीमेलेख याने माणसे पाठवून सारेला आपल्याकडे आणले.
3पण एका रात्री परमेश्वर स्वप्नात अबीमेलेखकडे आले आणि त्याला म्हणाले, “आता तुझा अंत झाल्यासारखाच आहे, कारण जी स्त्री तू आणली आहेस, ती विवाहित आहे.”
4पण अबीमेलेखाने तिला अद्याप स्पर्श केला नव्हता, म्हणून तो म्हणाला, “प्रभू, तुम्ही एक निरपराधी राष्ट्राचा अंत कराल काय? 5खुद्द अब्राहामानेच मला सांगितले नव्हते का की ती माझी बहीण आहे? आणि तिनेही सांगितले नव्हते का तो माझा भाऊ आहे? मी हे शुद्ध हृदयाने आणि शुद्ध हातांनी केले आहे.”
6परमेश्वराने त्याला स्वप्नात म्हणाले, “होय, ते मला माहीत आहे; ते तू शुद्ध हृदयाने केले आहे आणि म्हणूनच मी तुला पाप करण्यापासून रोखून धरले आणि तिला स्पर्शही करू दिला नाही. 7आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”
8दुसर्‍या दिवशी सकाळीच अबीमेलेखाने आपल्या सर्व अधिकार्‍यांना बोलाविले आणि काय घडले हे त्याने सांगितले, तेव्हा सर्व लोक फार घाबरले. 9मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.” 10मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?”
11अब्राहाम म्हणाला, “मी मनात विचार केला, ‘या शहरात कोणीही परमेश्वराला भीत नाही आणि माझ्या पत्नीमुळे ते माझा वध करतील.’ 12असे असूनही, ती माझी बहीण आहे, माझ्या वडिलांची मुलगी आहे, परंतु माझ्या आईची मुलगी नाही; आणि ती माझी पत्नी झाली. 13परमेश्वराने माझ्या वडिलांचे घर सोडून मला प्रवासास पाठविले, तेव्हा मी तिला म्हटले की, ‘जिथेही आपण जाऊ तिथे मी तुझा भाऊ आहे असे सांगून तू माझ्यावरील तुझी प्रीती मला दाखव.’ ”
14मग अबीमेलेखाने अब्राहामाला मेंढरे, बैल आणि स्त्री व पुरुष गुलाम दिले आणि त्याची पत्नी साराहदेखील त्याला परत केली. 15आणि अबीमेलेख म्हणाला, “माझा देश तुमच्यासमोर आहे. तुम्हाला आवडेल तिथे राहा.”
16मग साराहला तो म्हणाला, “तुझ्या भावाला मी चांदीचे एक हजार शेकेल#20:16 अंदाजे 12 कि.ग्रॅ. देत आहे. मी तुझ्यावर केलेल्या गुन्ह्याबद्दल तुझ्याबरोबरच्या लोकांसमोर ही भरपाई आहे; तू पूर्णपणे निर्दोष आहे.”
17यानंतर अब्राहामाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने अबीमेलेख राजा, राणी व त्याच्या दासी यांना आरोग्य दिले आणि त्यांना परत मुले होऊ लागली. 18कारण अब्राहामाची पत्नी साराह हिच्यामुळे याहवेहनी अबीमेलेखाच्या घराण्यातील सर्व स्त्रियांची गर्भधारणा बंद केली होती.

Attualmente Selezionati:

उत्पत्ती 20: MRCV

Evidenziazioni

Condividi

Copia

None

Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi