लूक 21

21
विधवेचे दान
1जेव्हा येशूंनी पाहिले, की श्रीमंत लोक मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान टाकत होते. 2त्याने एका गरीब विधवेलासुद्धा तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना पाहिले. 3येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक दिले आहे. 4कारण या सर्व लोकांनी आपल्या संपत्तीतून दान दिले आहे, परंतु हिने तर आपल्या गरीबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”
मंदिराचा नाश आणि युगाच्या समाप्तीची चिन्हे
5त्यांचे काही शिष्य मंदिराबद्दल प्रशंसा करीत होते की, ते कसे सुंदर पाषाणांनी आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या देणग्यांनी सजविले आहे. परंतु येशू म्हणाले, 6“जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक असलेला असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”
7“गुरुजी,” शिष्यांनी विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हाला सांगा? व या गोष्टी घडण्याच्या बेतात आल्या आहेत, याची कोणती चिन्हे असतील?”
8येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसवले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका. 9तुम्ही लढायासंबंधी ऐकाल व दंगे याविषयी ऐकाल, तेव्हा भयभीत होऊ नका. प्रथम या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट एवढ्यात होणार नाही.”
10मग त्यांनी म्हटले: “राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. 11निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12“तरी हे सर्व घडण्यापूर्वी, ते तुम्हाला पकडून तुमचा छळ करतील. माझ्या नावामुळे तुम्हाला सभागृहामध्ये नेतील व तुरुंगात टाकतील आणि तुम्हाला राज्यपाल आणि राजे यांच्यापुढे आणण्यात येईल. 13यामुळे तुम्हाला त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. 14तेव्हा स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी अगोदरच चिंता करू नका. 15कारण मी तुम्हाला योग्य शब्द आणि सुज्ञपणाचे विचार सुचवीन की ज्यास तुमचे शत्रू तुम्हाला अडविण्यास किंवा त्याचे खंडण करण्यास असमर्थ ठरतील. 16आईवडील, भाऊ आणि बहीण, नातेवाईक आणि मित्र, देखील तुमचा विश्वासघात करतील व तुम्हापैकी काहींना जिवे मारतील. 17माझ्यामुळे प्रत्येकजण तुमचा द्वेष करील. 18परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही. 19खंबीरपणे उभे राहा, म्हणजे जीवन मिळवाल.
20“तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. 21त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे देशाबाहेर आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये. 22कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. 23गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ दयनीय असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल. 24काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.
25“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्‍या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील. 26भीतीमुळे लोक बेशुद्ध पडतील, जगावर काय घडून येणार आहे, या गोष्टीमुळे काळजीत पडतील. कारण आकाशमंडळ हालवली जातील. 27त्यावेळी मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशात मेघारूढ होऊन सामर्थ्याने व पराक्रमाने परत येत असलेले पाहाल. 28या सर्वगोष्टी घडण्यास प्रारंभ होईल, तेव्हा उभे राहा आणि वर नजर लावा कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ आली आहे असे समजा.”
29नंतर येशूंनी लोकांना हा दाखला सांगितला: “अंजिराच्या झाडाकडे आणि सर्व झाडांकडे पाहा. 30जेव्हा पालवी फूट लागते तेव्हा तुम्ही स्वतःच असे पाहू शकता आणि ओळखता की उन्हाळा जवळ आला आहे. 31तसेच मी सांगितलेल्या गोष्टी घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा परमेश्वराचे राज्य जवळ आहे हे समजून घ्या.
32“मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. 33आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
34“सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल. 35कारण संपूर्ण पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांवर तो येईल. 36पुढे घडणार्‍या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”
37येशू दररोज मंदिरात शिक्षण देण्यासाठी जात असत, नंतर रोज संध्याकाळी ते जैतून डोंगरावर रात्र घालविण्यासाठी जात असत. 38आणि सर्व लोक त्यांचे ऐकण्यासाठी भल्या सकाळीच मंदिराकडे येत.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

लूक 21: MRCV

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល