उत्पत्ती 11

11
बाबेल येथील बुरूज
1सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती.
2पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले, आणि तेथे त्यांनी वस्ती केली.
3ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करून पक्क्या भाजू.” त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले.
4मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”
5तेव्हा मानवपुत्र नगर व बुरूज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला.
6परमेश्वर म्हणाला, “पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे, ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे; आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही.
7तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.”
8नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले.
9म्हणून त्या नगराचे नाव ‘बाबेल’ असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.
शेमाचे वंशज
(१ इति. 1:24-27)
10शेमाची वंशावळ येणेप्रमाणे : शेम शंभर वर्षांचा झाल्यावर जलप्रलयानंतर दोन वर्षांनी त्याला अर्पक्षद झाला.
11अर्पक्षद झाल्यावर शेम पांचशे वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
12अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह झाला;
13शेलह झाल्यावर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
14शेलह तीस वर्षांचा झाल्यावर त्याला एबर झाला.
15एबर झाल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
16एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला;
17पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
18पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला.
19रऊ झाल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला; आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
20रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरूग झाला;
21सरूग झाल्यावर रऊ दोनशे सात वर्षें जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
22सरूग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला;
23नाहोर झाल्यावर सरूग दोनशे वर्षें जगला; आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
24नाहोर एकोणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला;
25तेरह झाल्यावर नाहोर एकशे एकोणीस वर्षें जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
26तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झाले.
तेरहाचे वंशज
27तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे : तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले, व हारानास लोट झाला.
28हारान आपला बाप तेरह ह्याच्यादेखत आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.
29अब्राम व नाहोर ह्यांनी बायका केल्या; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का; मिल्का ही हारानाची कन्या; हा हारान मिल्का व इस्का ह्यांचा बाप.
30साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
31मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम ह्याची बायको साराय, ह्यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जायला निघाला; आणि ते हारान येथे जाऊन राहिले.
32तेरहाचे वय दोनशे पाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला.

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요