उत्पत्ती 7

7
जलप्रलय
1मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.
2सर्व शुद्ध पशूंपैकी सातसात नरमाद्या आणि अशुद्ध पशूंपैकी दोन-दोन नरमाद्या,
3आणि आकाशातील पक्ष्यांपैकी सातसात नरमाद्या बरोबर घे; अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील.
4अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.”
5तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.
6पृथ्वीवर जलप्रलय झाला त्या वेळी नोहा सहाशे वर्षांचा होता.
7हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना ह्यांना घेऊन तारवात गेला.
8शुद्ध-अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांतून 9नर व मादी अशी जोडीजोडीने, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली.
10सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले.
11नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली.
12चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली.
13ह्याच दिवशी नोहा, आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, आणि त्यांच्याबरोबर नोहाची बायको व त्याच्या तिघी सुना हे तारवात गेले.
14हे आणि प्रत्येक जातीचे वनपशू, प्रत्येक जातीचे ग्रामपशू, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले.
15सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक जोडी नोहाकडे तारवात गेली.
16देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक नरमादी आत गेली; मग परमेश्वराने त्याला आत बंद केले.
17पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला, आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले.
18प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले.
19पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडवले.
20पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले, ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले.
21तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशू, वनपशू, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले;
22ज्याच्या म्हणून नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले.
23पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्वकाही म्हणजे मानव, पशू, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला; ते पृथ्वीवरून नाहीसे झाले; नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले.
24दीडशे दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते.

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요