मत्तय 10
10
बारा प्रेषितांची कामगिरीवर रवानगी
1येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व रोग व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. 2त्या बारा प्रेषितांची नावे अशी: पहिला पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, 3फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, 4शिमोन कनानी व येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत.
5ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. 6तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेढरांकडे जा. 7जात असताना अशी घोषणा करा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. 8रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना बरे करा, भुते काढा, तुम्हांला मोफत मिळाले, मोफत द्या. 9सोने, रुपे किंवा तांबे आपल्या खिशात घेऊ नका. 10वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण कामगार त्याच्या वेतनाला पात्र आहे.
11ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, त्या त्या ठिकाणी उचित व्यक्तीचा शोध घ्या आणि तुम्ही तेथून निघून जाईपर्यंत तेथेच राहा. 12घरात प्रवेश करताना नमस्कार करा. 13ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. 14जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा त्या नगरातून निघताना तुमच्या पायांची धूळ झटकून टाका. 15मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरातील लोकांपेक्षा सदोम व गमोरा ह्या नगरांतील लोकांना परमेश्वर अधिक दया दाखवील.
16लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो. तुम्ही सापांसारखे चाणाक्ष व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. 17माणसांच्या बाबतीत जपून राहा. ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. त्यांच्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील. 18तुम्हांला माझ्यामुळे सत्ताधिकारी व राजे ह्यांच्यापुढे खटल्यासाठी नेण्यात येईल, तेव्हा तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष देऊ शकाल. 19जेव्हा तुम्हांला त्यांच्यापुढे नेतील, तेव्हा कसे बोलावे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका. ते तुम्हांला त्याच वेळी सुचवले जाईल. 20कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलणारा आहे.
21भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील. 22माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल. 23जर एका नगरात तुमचा छळ झाला तर दुसऱ्या नगरात तुम्ही आश्रय घ्या. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सगळ्या नगरांत तुमचे कार्य पूर्ण झालेले नसेल.
24गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास महान नाही. 25शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, एवढे पुरे. कुटुंबप्रमुखाला बाल्जबूल म्हणतात तर कुटुंबातील सदस्यांना कितीतरी अधिक वाईट नावे ठेवतील!
26तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल. 27जे मी तुम्हांला अंधारात सांगतो त्याची उजेडात पुनरुक्ती करा आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता, ते छपरावरून घोषित करा. 28जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा. 29दोन चिमण्यांची किंमत ती काय? पण तुमच्या पित्याच्या संमतीशिवाय त्यांतून एकही जमिनीवर पडत नाही. 30तसेच तुमच्या डोक्यावरचे सर्व केसदेखील मोजलेले आहेत. 31म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे!
32जो कोणी इतरांसमोर मला पत्करील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. 33परंतु जो कोणी इतरांसमोर मला नाकारील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
34मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे. 35मुलगा व वडील, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यांत फूट पाडायला मी आलो आहे. 36मनुष्याचे कुटुंबीयच त्याचे वैरी होतील.
37जो माझ्यापेक्षा वडिलांवर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तोही माझ्यासाठी योग्य नाही. 38जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही. 39जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल.
40जो तुमचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. 41जो कोणी संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्याचे पारितोषिक मिळेल. जो कोणी नीतिमान माणसाचा नीतिमान माणूस म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान माणसाचे पारितोषिक मिळेल. 42ह्या लहानांतल्या एकाला तो माझा शिष्य आहे म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो त्याला त्याचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हांला निक्षून सांगतो.”
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.