Logo ya YouVersion
Elilingi ya Boluki

मत्तय 12

12
येशू शब्बाथाचा धनी
1शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले. 2जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”
3येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय, दावीद राजा आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली होती, तेव्हा त्याने काय केले? 4तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, अशा गोष्टी त्यांनी करणे हे नियमानुसार योग्य नव्हते, परंतु फक्त याजकांसाठीच त्या योग्य होत्या. 5मंदिरात सेवा करीत असलेले याजक शब्बाथ दिवशी काम करून शब्बाथ विटाळवितात तरी ते निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? 6मी तुम्हाला सांगतो की, मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे. 7‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया मला हवी आहे.’#12:7 होशे 6:6 या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता. 8कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”
9नंतर ते तेथून निघाले आणि सभागृहामध्ये गेले 10तेथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे कायदेशीर आहे काय?”
11येशूंनी त्यांना उत्तर दिले, “समजा, तुमच्याजवळ एकच मेंढरू आहे आणि शब्बाथ दिवशी ते विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला धरून वर काढणार नाही काय? 12मग मेंढरापेक्षा मनुष्य कितीतरी पटीने अधिक मोलवान आहे! म्हणून शब्बाथ दिवशी चांगले करणे नियमानुसार आहे.”
13मग ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो पहिल्यासारखा अगदी इतरांसारखा चांगला झाला. 14परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली.
परमेश्वराचा निवडलेला सेवक
15परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्‍यांना बरे केले. 16त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली. 17या घटनेद्वारे यशया संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली ती अशी:
18“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे,
जो माझा प्रिय, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;
माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवीन.
राष्ट्रांना तो न्याय प्रकट करील.
19तो भांडणार नाही किंवा उंचस्वराने बोलणार नाही.
रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.
20विजयाने न्याय आणेपर्यंत
दबलेला बोरु तो मोडणार नाही,
आणि मिणमिणती वात मालवणार नाही.
21त्याच्या नावामध्ये सर्व राष्ट्रे आपल्या आशा एकवटतील.”#12:21 यश 42:1-4
येशू आणि बालजबूल
22नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता आणि येशूंनी त्याला बरे केले. व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. 23तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?”
24परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.”
25त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही. 26जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? 27आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील. 28पण मी परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
29“किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला अगोदर बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
30“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो. 31आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही. 32जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल त्याला या युगात आणि येणार्‍या युगात कधीही क्षमा होणार नाही.
33“एखादे झाड त्याच्या फळांवरून तुम्हाला ओळखता येते. चांगल्या जातीचे झाड वाईट फळ देत नाही किंवा वाईट जातीचे झाड चांगले फळ देत नाही. 34अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते. 35चांगला मनुष्य आपल्या चांगल्या अंतःकरणातून चांगल्याच गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा माणूस वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो. 36मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. 37कारण तुमच्या शब्दांवरुनच तुम्ही निर्दोष ठराल किंवा तुमच्या शब्दांवरुनच तुम्ही दोषी ठराल.”
योनाचे चिन्ह
38मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, आम्हाला तुमच्याकडून एक चिन्ह पाहायचे आहे.”
39येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” 40कारण ज्याप्रमाणे योना मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री राहिला, त्याचप्रमाणे मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील. 41न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि योनापेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे. 42न्यायाच्या दिवशी शबाची राणीही या राष्ट्रांविरुद्ध उठेल आणि त्याला दोषी ठरवेल. कारण शलमोनाची ज्ञानवचने ऐकण्यासाठी ती दूर देशाहून आली आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असलेला एकजण येथे आहे.
43“एखाद्या मनुष्यातून दुरात्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष प्रदेशात विश्रांती घेण्यासाठी जागा शोधीत फिरतो, पण ती त्याला सापडत नाही, 44मग तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तेथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून पुसून स्वच्छ व व्यवस्थित केलेले आढळते. 45त्यावेळी आपल्यापेक्षाही दुष्ट असलेले आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते त्या मनुष्यामध्ये शिरतात आणि तेथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते तसेच या दुष्ट पिढीचे होईल.”
येशूंची आई आणि भाऊ
46येशू समूहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. 47कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.”
48त्यांनी त्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” 49मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवीत ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत. 50ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.”

Currently Selected:

मत्तय 12: MRCV

Tya elembo

Share

Copy

None

Olingi kobomba makomi na yo wapi otye elembo na baapareyi na yo nyonso? Kota to mpe Komisa nkombo