प्रेषितांचे कार्य 5

5
हनन्या व सप्पीरा
1हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली. 2परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला. 3पेत्र त्याला म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून तू तुझे मन सैतानाच्या ताब्यात का दिलेस? 4विकण्यापूर्वी ती जमीन तुझी स्वतःची होती व विकल्यावर सर्व रक्‍कम तुझीच नव्हती काय? तर मग असे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” 5हे शब्द ऐकताच तो खाली पडला व मरण पावला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. 6नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले.
7सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी आत आली तेव्हा जे घडले ते तिला ठाऊ क नव्हते. 8पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.”
9पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यात तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या पतीला पुरले ते एवढ्यातच परत येत आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” 10ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. 11ह्यावरून सबंध ख्रिस्तमंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले.
प्रेषितांनी केलेली अद्भुत कृत्ये
12प्रेषितांच्या हस्ते लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत कृत्ये घडत असत. ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत. 13त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत. 14प्रभूवर विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया त्यांना मिळत गेले. 15इतके की, लोक रुग्णांना रस्त्यावर आणून खाटांवर आणि चटयांवर ठेवीत, ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. 16तसेच यरुशलेमच्या आसपासच्या नगरांतून लोकसमुदाय रुग्णांना व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत.
प्रेषितांचा छळ
17उच्च याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी सहकारी मत्सराने पेटून उठले. 18त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात टाकले. 19परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, 20“जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.”
21हे ऐकून दिवस उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन प्रबोधन करू लागले. इकडे उच्च याजक व त्याचे सहकारी ह्यांनी येऊन न्यायसभेला व यहुदी लोकांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलावले आणि प्रेषितांना आणावयास शिपायांना तुरुंगाकडे पाठवले. 22पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, 23“तुरुंग व्यवस्थित कुलुपबंद असलेला आणि दरवाजापाशी पहारेकरी उभे असलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही.”
24हे वृत्त ऐकून ह्याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी मंदिर रक्षकांचा अधिकारी व मुख्य याजक त्रस्त झाले. 25इतक्यात कोणी तरी येऊन त्यांना असे सांगितले, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते, ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिकवण देत आहेत!” 26तेव्हा अधिकाऱ्याने शिपायांसह जाऊन त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती न करता त्यांना आणले, कारण लोक आपल्याला दगड मारतील, अशी त्यांना भीती वाटत होती.
27त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. उच्च याजकाने प्रेषितांना विचारले, 28“ह्या नावाने शिकवण देऊ नका, असे आम्ही तुम्हांला बजावले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात!”
29परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. 30ज्या येशूला तुम्ही क्रुसावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. 31त्याने इस्राएलला पश्चात्ताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. 32ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षीदार आहोत आणि देवाने त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे, तोही साक्षीदार आहे.”
33हे ऐकून न्यायसभेचे सदस्य संतापले आणि प्रेषितांना ठार मारण्याचा विचार करू लागले. 34तेथे सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परुशी धर्मशास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले. 35मग तो न्यायसभेला म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार, ह्याविषयी नीट विचार करा. 36कारण काही दिवसांपूर्वी थुदासने पुढे येऊन ‘मी कोणीतरी आहे’ असा दावा केला. त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते दिसेनासे झाले. 37त्याच्यामागून गालीलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसांत पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून त्याच्या बाजूला वळवले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते, त्या सर्वांची पांगापांग झाली. 38म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या! ही योजना किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास ते लयास जाईल, 39परंतु ते देवाचे असल्यास, तुम्हांला ते नाहीसे करता येणार नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधक ठराल!” न्यायसभेने गमलियेलचे सांगणे मान्य केले.
40त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना चाबकाने फटके मारले आणि यापुढे येशूच्या नावाने बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. 41ते तर येशूच्या नावासाठी आपल्याला अपमानास पात्र ठरविण्यात आले म्हणून न्यायसभेपुढून आनंदाने निघून गेले. 42दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे, हे शुभवर्तमान घोषित करण्याचे त्यांनी चालू ठेवले.

Paryškinti

Dalintis

Kopijuoti

None

Norite, kad paryškinimai būtų įrašyti visuose jūsų įrenginiuose? Prisijunkite arba registruokitės