Лого на YouVersion
Икона за пребарување

योहा. 8

8
व्यभिचारी स्त्री
1येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला, 2नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. 3तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले, 4“गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. 5मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” 6त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. 7आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.” 8मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. 9हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. 10नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” 11ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”
12पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
13यावरुन परूशी त्यास म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.” 14येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही. 15तुम्ही देहानुसार न्याय करता; मी कुणाचा न्याय करीत नाही. 16आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोसुध्दा आहे. 17तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. 18मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.” 19यावरुन ते त्यास म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” 20तो परमेश्वराच्या भवनात शिकवीत असताही वचने जामदारखान्यात बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
21पुन्हा तो त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.” 22यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.” 23तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही. 24म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.” 25यावरुन ते त्यास म्हणाले, “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हास जे सांगत आलो तेच नाही का? 26मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो.” 27तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही. 28तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो. 29ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्‍या गोष्टी करतो.” 30येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
31ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. 32तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.” 33त्यांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?” 34येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. 35दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. 36म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल. 37मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. 38मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”
39त्यांनी त्यास उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये कराल. 40परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास म्हणजे मला तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्राहामाने असे केले नाही. 41तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्ये करता.” ते त्यास म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.” 42येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले. 43तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही. 44तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. 45पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. 46तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? 47देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
48यहूद्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हास भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?” 49येशूने त्यांना उत्तर दिले, “मला भूत लागले नाही; तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. 50मी स्वतःचे गौरव करू पाहत नाही; ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच. 51मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.” 52यहूदी लोक त्यास म्हणाले, “आता आम्हास कळले की, तुम्हास भूत लागले आहे. अब्राहाम मरण पावला आणि संदेष्टेही मरण पावले; आणि तुम्ही म्हणता की, कोणी माझे वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही. 53आमचा पिता अब्राहाम मरण पावला; त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? आणि संदेष्टेही मरण पावले; तुम्ही स्वतःला काय समजता?” 54येशूने उत्तर दिले, “मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही, माझे गौरव करणारा माझा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता. 55तरी तुम्ही त्यास ओळखले नाही, मी त्यास ओळखतो आणि मी त्यास ओळखत नाही असे जर मी म्हणेन, तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण, मी त्यास ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो. 56माझा दिवस बघायला तुमचा पिता अब्राहाम उल्लसीत झाला; तो त्याने पाहिला व त्यास आनंद झाला.” 57यहूदी त्यास म्हणाले, “तुम्हास अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामाला पाहिले आहे काय?” 58येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापुर्वी मी आहे.” 59यावरुन त्यांनी त्यास मारायला दगड उचलले, पण येशू परमेश्वराच्या भवनामधून गुप्तपणे निघून गेला.

Селектирано:

योहा. 8: IRVMar

Нагласи

Сподели

Копирај

None

Дали сакаш да ги зачуваш Нагласувањата на сите твои уреди? Пријави се или најави се