लूक 24
24
प्रभू येशूचे पुनरुत्थान
मत्त. 28:1-10; मार्क 16:1-8; योहा. 20:1-10
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. 2त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. 4यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता? 6तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. 7ते असे की, “मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” 8नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली. 9त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
अम्माऊस गावाच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन
मार्क 16:12, 13
13त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. 18त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?” 19येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले. 21आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, 23परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.” 25मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” 27आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. 28ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला. 30जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” 33मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.” 35नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले.
येशूचे प्रेषितांना दर्शन
योहा. 20:19-23; प्रेषि. 1:3-5; 1 करिं. 15:5
36ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 37ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. 38तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? 39माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.” 40असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. 41तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?” 42मग त्यांनी त्यास भाजलेला माशाचा तुकडा दिला. 43त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44तो त्यांना म्हणाला, “याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.” 45नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 46मग तो त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, 47आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी. 48या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. 49पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.”
येशूचे स्वर्गारोहण
मार्क 16:19, 20; प्रेषि. 1:9
50नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. 51तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला. 52नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरूशलेम शहरास परतले. 53आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.
Селектирано:
लूक 24: IRVMar
Нагласи
Сподели
Копирај
Дали сакаш да ги зачуваш Нагласувањата на сите твои уреди? Пријави се или најави се
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.