तेव्हा गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्या बाबतीत का घडले? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हांला मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हांला मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.”