मी दृष्टी लावली आणि उत्तरेकडून तुफानी वारा, चकाकणार्या विजांसहित एक मोठा ढग प्रखर प्रकाशाने गुंडाळलेला असा मला दिसला. अग्नीचा मध्यभाग झळकत्या धातूसारखा होता, आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते, परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते. त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते. त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते. एकाचे पंख दुसर्याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे.