माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील
आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,
सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील,
तुझे मन समंजसपणाकडे लावशील—
मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील,
आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,
आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील
आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,
तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल
आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.