YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 11

11
1जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.
सभेत अप्रशस्त वर्तन
2तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो.
3प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे.
4जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो;
5तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.
6स्त्री जर आपले मस्तक आच्छादत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावेत, परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडण करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे.
7पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.
8कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली.
9पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली.
10ह्या कारणामुळे देवदूतांकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
11तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही.
12कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे, आणि सर्वकाही देवापासून आहे.
13तुम्हीच आपसांत ठरवा; मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय?
14लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय?
15स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे; कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत.
16तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही.
प्रभुभोजनाचे भ्रष्टीकरण
17आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते.
18कारण प्रथम हे की, तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो;
19कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.
20ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते.
21कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसर्‍यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो.
22खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हांला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही.
23कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली;
24आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.”
25मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”
26कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.
27म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचाप्यालापिईलतोप्रभूचेशरीरवरक्तह्यासंबंधानेदोषीठरेल.
28म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
29कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.2
30तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच.
31आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.
32ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये.
33म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा.
34कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.

सध्या निवडलेले:

१ करिंथ 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन