१ करिंथ 13
13
प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय
1मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
2मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.
3मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
4प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही;
5ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही;
6ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते;
7ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.
8प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.
9कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो;
10पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.
11मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
12कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
13सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.
सध्या निवडलेले:
१ करिंथ 13: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.