१ करिंथ 6
6
ख्रिस्ती लोकांची न्यायालयात गेलेली भांडणे
1तुमच्यापैकी कोणाएकाचा दुसर्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करत आहे काय?
2किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय?
3आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच.
4तुम्हांला व्यावहारिक प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा आहे, तर मंडळीत जे हिशेबात नाहीत त्यांना कसे नेमता?
5तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय?
6परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो, आणि तीही विश्वास न ठेवणार्यांपुढे करतो हे कसे?
7तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?
8उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता, आणि ती बंधुजनांची करता.
9अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,
10चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
11आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.
अशुद्धता ही ख्रिस्ती माणसाच्या जीवनक्रमाशी विसंगत आहे
12“सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही; “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.
13“अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे;” पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे; आणि शरीरासाठी प्रभू आहे.
14देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.
15तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावेत काय? कधीच नाही!
16जो कसबिणीशी जडला तो व ती एकशरीर आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण “ती दोघे एकदेह होतील” असे तो म्हणतो.
17परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत.
18जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.
19तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;
20कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.
सध्या निवडलेले:
१ करिंथ 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.