१ शमुवेल 5
5
पलिष्ट्यांच्या प्रदेशात कोशाचे वास्तव्य
1पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.
2पलिष्ट्यांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला.
3अश्दोदकर दुसर्या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले.
4दुसर्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे, त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले.
5ह्या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अश्दोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत.
6मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला; त्याने त्यांचा नाश केला; त्याने अश्दोदकर व त्यांच्या आसपासच्या गावांतील लोक ह्यांना ग्रंथीच्या व्याधीने पिडले.
7हे पाहून अश्दोदकरांनी म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन ह्याच्यावर जबर पडला आहे.”
8मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला.
9तो कोश तेथे मिरवत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबालवृद्धांना पिडले; त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या.
10मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”
11मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमवले आणि म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करायचा नाही.” कारण सर्व नगरात कहर गुदरला होता, आणि देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता.
12जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या आणि त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहचला.
सध्या निवडलेले:
१ शमुवेल 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.