1 थेस्सल 3
3
तीमथ्याकडे सोपवलेली कामगिरी
1आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनैतच एकटे मागे राहावे, हे आम्हांला बरे वाटले.
2आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;
3तो असा की, ह्या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत, हे तुम्ही स्वत: जाणून आहात.
4कारण आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हांला सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगायची आहेत; आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे.
5ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
6आता तीमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हांला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हांला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्यांविषयीचे सुवर्तमान आम्हांला कळवले;
7ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आपल्या सर्व अडचणींत व संकटांत तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले;
8कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असलात तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल.
9कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत त्याबद्दल तुमच्यासंबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावेत?
10आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी.
11देव, आपला पिता हा स्वत:, व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो;
12आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
13ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.
सध्या निवडलेले:
1 थेस्सल 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.