२ इतिहास 30
30
वल्हांडण सण पाळण्यात येतो
1हिज्कीयाने सर्व इस्राएल व यहूदा ह्यांना आणि एफ्राईम व मनश्शे ह्यांनाही पत्रे लिहून कळवले की, ‘तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरात इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायला या.’ 2राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी ह्यांनी विचार करून असे ठरवले होते की वल्हांडण सण दुसर्या महिन्यात पाळावा.
3त्यांना तो त्या वेळी पाळता आला नाही. कारण थोड्याच याजकांनी आपणांस पवित्र केले होते व लोकही यरुशलेमेत जमले नव्हते.
4ही गोष्ट राजाला व सगळ्या जनसमुदायाला पसंत पडली.
5लोकांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ यरुशलेमेस येऊन वल्हांडण सण पाळावा असा डांगोरा बैर-शेब्यापासून दानापर्यंत सर्व इस्राएलात पिटवावा असा त्यांनी ठराव केला, ह्या प्रकारे एवढ्या मोठ्या समुदायाने हा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला नव्हता.
6मग राजा व त्याचे सरदार ह्यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहूदा प्रांतात फिरले; ते लोकांना सांगत गेले की, “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून वाचून तुमचे जे लोक उरले आहेत त्यांच्याकडे तो वळेल.
7तुम्ही आपल्या वाडवडिलांप्रमाणे व आपल्या भाऊबंदांप्रमाणे होऊ नका; त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा अपराध केल्यामुळे त्याने त्यांची दुर्दशा केली हे तुम्हांला दिसतच आहे.
8तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा.
9तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंद व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्यांच्यावर दया करतील व ती ह्या देशास परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरवणार नाही.”
10ह्या प्रकारे एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतांतील नगरानगरांतून फिरत जासूद जबुलूनापर्यंत गेले, पण लोकांनी त्यांची टर उडवून फटफजिती केली.
11तरी आशेर, मनश्शे व जबुलून ह्यांतले काही लोक नम्र होऊन यरुशलेमेस आले.
12आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.
13दुसर्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण पाळण्यास पुष्कळ लोकांचा मोठा समुदाय यरुशलेमेत जमा झाला.
14त्यांनी उठून यरुशलेमेतील सर्व वेद्या व धूप जाळण्याच्या सर्व वेद्या काढून किद्रोन नाल्यात फेकून दिल्या.
15त्यांनी दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणपशू मारले, तेव्हा याजक व लेवी लज्जित झाले व त्यांनी आपणांस पवित्र करून होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
16देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रानुसार आपल्या क्रमाप्रमाणे ते आपल्या ठिकाणी उभे राहिले; त्यांनी लेव्यांच्या हातून रक्त घेऊन शिंपडले.
17ज्यांनी आपणांस पवित्र केले नव्हते असे पुष्कळ लोक त्या मंडळीत होते, म्हणून सर्व अशुद्ध लोकांप्रीत्यर्थ वल्हांडणाचे यज्ञपशू अर्पून परमेश्वरासाठी पवित्र करण्याचे काम लेव्यांना सांगितले.
18बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनश्शे, इस्साखार व जबुलून ह्यांतल्या पुष्कळांनी आपणांस शुद्ध केले नव्हते ते वल्हांडणाच्या पशूचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते, कारण हिज्कीयाने त्यांच्याप्रीत्यर्थ प्रार्थना केली की,
19“जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागले आहेत ते पवित्रस्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापांची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो.”
20हिज्कीयाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांना क्षमा केली.
21जे इस्राएल लोक यरुशलेमेत हजर होते त्यांनी सात दिवसपर्यंत बेखमीर भाकरीचा सण मोठ्या आनंदाने पाळला आणि प्रतिदिनी लेवी व याजक परमेश्वराप्रीत्यर्थ महानादाची वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करीत होते.
22जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.
23मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी सात दिवस उत्सव करावा आणि ह्याप्रमाणे त्यांनी आणखी सात दिवस आनंदाने पाळले.
24यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अर्पणासाठी मंडळीला एक हजार गोर्हे आणि सात हजार मेंढरे दिली; आणि सरदारांनी मंडळीला एक हजार गोर्हे व दहा हजार मेंढरे दिली; त्या वेळी पुष्कळ याजकांनी आपणांस पवित्र केले.
25तेव्हा याजक व लेवी ह्यांच्यासह यहूदाची सारी मंडळी आणि इस्राएलातून आलेले लोक व इस्राएलातून आलेले व यहूदात राहणारे परदेशीय ह्या सर्वांनी उत्सव केला.
26यरुशलेमेत फार आनंद झाला; इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता.
27मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांना आशीर्वाद दिले; त्यांची वाणी देवाने ऐकली, आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत, स्वर्गापर्यंत जाऊन पोहचली.
सध्या निवडलेले:
२ इतिहास 30: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.