YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 34

34
योशीयाची कारकीर्द
(२ राजे 22:1-2)
1योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले.
2परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही.
योशीयाने केलेल्या सुधारणा
(२ राजे 23:4-20)
3आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला.
4लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या; त्यांच्या वरच्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडूनतोडून टाकल्या; अशेरामूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यांना यज्ञ करीत असत त्यांच्या कबरांवर पसरले.
5पुजार्‍यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या; ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुशलेम ही शुद्ध केली.
6त्याने मनश्शे, एफ्राईम, शिमोन व नफताली येथपर्यंतच्या शहरांत व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले.
7त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरामूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्यांचे चूर्ण केले आणि इस्राएल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडूनफोडून टाकल्या आणि मग तो यरुशलेमेस परत आला.
नियमशास्त्राचा ग्रंथ सापडतो
(२ राजे 22:3—23:3)
8आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास शाफान बिन असल्या, नगराचा कारभारी मासेया आणि योवाह बिन योवाहाज अखबारनवीस ह्यांना पाठवले.
9ते मुख्य याजक हिल्कीया ह्याच्याकडे गेले आणि द्वारपाळ लेवी ह्यांनी मनश्शे, एफ्राईम, इस्राएलाचे अवशिष्ट लोक, सर्व यहूदा व बन्यामीन आणि यरुशलेमनिवासी ह्या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला.
10त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्‍या कामगारांच्या हाती दिला, आणि त्या मंदिराची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करण्याकडे तो त्या कामगारांनी लावला.
11तासलेले चिरे, कैच्यांसाठी लाकूड आणि यहूदाच्या राजांनी मोडून टाकलेल्या घरांसाठी कडीपाट विकत घेण्यास त्यांनी तो पैसा सुतार व बांधकाम करणारे ह्यांना दिला.
12त्या माणसांनी ते काम सचोटीने केले; त्यांच्यावर देखरेख करण्यास नेमलेले मरारी वंशातील लेव्यांपैकी यहथ व ओबद्या, आणि कहाथी वंशातील जखर्‍या व मशुल्लाम हे होते; गायनवादनाचे मर्म जाणणारे लेवी हेही होते.
13बोजे वाहणार्‍यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्‍यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते.
14परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता मोशेच्या द्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्कीया याजकाला सापडला.
15हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला.
16शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्याला त्याने अशी खबर दिली की, “तुझ्या दासांना जे काही काम सोपवले होते ते ते करीत आहेत;
17आणि परमेश्वराच्या मंदिरात जो पैसा मिळाला तो थैल्यांत भरून देखरेख करणारे व कामगार ह्यांच्या हवाली केला आहे.”
18शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला.
19त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली.
20मग राजाने हिल्कीया, अहीकाम बिन शाफान, अब्दोन1 बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,
21“हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्राएल व यहूदा ह्यांत जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा. ह्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आमच्यावर केली आहे, ती फार मोठी आहे.”
22मग हिल्कीया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत2 बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्या वेळी यरुशलेमेत दुसर्‍या पेठेत राहत होती; तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळवले.
23तेव्हा ती त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हांला माझ्याकडे पाठवले त्याला जाऊन सांगा :
24‘परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजासमोर जो ग्रंथ वाचला त्यात लिहिलेल्या सर्व शापांप्रमाणे मी ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर अनिष्ट आणीन.
25कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.
26तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्‍न करण्यास पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून
27तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
28पाहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.” त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.
29मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले.
30यहूदा येथील सर्व लोक, यरुशलेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.
31मग राजाने आपल्या स्थानी उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, ‘मी परमेश्वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन व त्या ग्रंथातील कराराच्या वचनांप्रमाणे वर्तेन.’
32मग यरुशलेमेत व बन्यामिनात जे सर्व लोक आढळले त्यांना त्याने आपल्या करारात सामील केले. यरुशलेमकर आपल्या वडिलांच्या देवाच्या कराराप्रमाणे वागू लागले.
33इस्राएल लोक ज्या सर्व प्रदेशांत होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्राएल त्यांना मिळाले तितक्या सर्वांना त्याने त्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला लावले, त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला अनुसरायचे सोडले नाही.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 34: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन