२ करिंथ 9
9
1तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;
2कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.
3तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे;
4नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आमची — तुमची म्हणत नाही — फजिती होईल.
5म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेने न देता उदार अंत:करणाने द्यावी; म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले.
वर्गणी कशी द्यावी
6हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.
7प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.
8सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
9“तो चहूकडे वाटप करीत असतो;
दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो;
त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,”
असे शास्त्रात लिहिले आहे.
10जो ‘पेरणार्याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.
11म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.
12ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते.
13ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, तुम्ही ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यांमुळे देवाचा गौरव होतो;
14आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात.
15देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.
सध्या निवडलेले:
२ करिंथ 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.