उपदेशक 9
9
जीवनातील विसंगती
1ह्या सगळ्यांचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला; ते हे की नीतिमान व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत; आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्याला कळत नाही; हे सर्वकाही त्याला पुढे प्राप्त होणार असते.
2जे काही घडते ते सर्वांना सारखेच घडते; नीतिमान व दुष्ट, सात्त्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते; सात्त्विकाची व पाप्याची, शपथ वाहणार्याची, तशीच शपथ वाहण्यास भिणार्याची सारखीच दशा होते.
3भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.
4जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा.
5आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.
6त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.
7जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.
8तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो.
9देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.
10जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.
11मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.
12कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.
सामर्थ्यापेक्षा ज्ञान थोर
13मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले; ते असे :
14एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते; त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्यासमोर मोठाले मोर्चे लावले.
15त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही.
16तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत.
17मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे.
18युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.
सध्या निवडलेले:
उपदेशक 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.