YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 3

3
यहूद्यांचा नायनाट करण्याचे हामानाचे कारस्थान
1ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.
2राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे.
3तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?”
4ते रोज त्याला असे बोलत तरी त्याने त्यांना जुमानले नाही, तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरता त्यांनी हामानाच्या कानी ही गोष्ट घातली; आपण यहूदी आहोत असे त्याने त्यांना सांगितले होते.
5मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.
6एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते; त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहूदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला.
7अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे नीसान महिन्यापासून हामानासमक्ष पूर (चिठ्ठ्या) टाकायला लावल्या. हा क्रम दररोज, दरमहा, बारावा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला.
8हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही.
9राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी; राजभांडारात जमा करण्यासाठी मी दहा हजार किक्कार चांदी राजाच्या कारभार्‍यांच्या हाती देतो.”
10तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू जो अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला दिली.
11राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल त्याप्रमाणे त्यांचे कर.”
12तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती.
13राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी.
14ह्या आज्ञापत्राच्या नकला सर्व प्रांतांतून खुल्या पाठवण्यात आल्या, त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे.
15हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले; त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले; पण शूशन नगर चिंताक्रांत झाले.

सध्या निवडलेले:

एस्तेर 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन