YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 36

36
1परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्रस्थानाच्या सेवेसाठी सर्व तर्‍हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाने आणतात 2नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती, त्यांना मोशेने बोलावले,
3आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी, म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला.
4इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले, 5आणि ते मोशेला म्हणाले, “परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करायला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत.
6तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की, कोणाही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. ह्याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांना प्रतिबंध झाला.
7त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.
निवासमंडपाची रचना
(निर्ग. 26:1-37)
8त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनवला; हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यांवर कुशल कारागिराकडून करूब काढवले.
9एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती; ते सर्व पडदे एकाच मापाचे होते.
10त्यांनी त्यांतले पाच पडदे एकमेकांशी जोडले, व दुसरे पाच पडदे एकमेकांशी जोडले.
11त्यांनी जेथे एक पडदा जोडला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लावली, तसेच दुसर्‍या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.
12एका पडद्याला त्यांनी पन्नास बिरडी केली व दुसर्‍या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ही बिरडी समोरासमोर होती.
13तसेच त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे बनवले; त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडले की, सर्व मिळून निवासमंडप अखंड झाला.
14निवासमंडपावर तंबू असावा म्हणून बकर्‍यांच्या केसांचे अकरा पडदे त्यांनी बनवले.
15एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात होती; हे अकरा पडदे एकाच मापाचे होते.
16त्यांनी पाच पडदे वेगळे जोडले व सहा पडदे वेगळे जोडले.
17अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी पन्नास बिरडी केली, तशीच दुसर्‍या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी पन्नास बिरडी केली.
18हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे बनवले.
19ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन त्यांनी केले.
20मग निवासमंडपासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या केल्या.
21प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद होती.
22प्रत्येक फळी दुसर्‍या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन-दोन कुसे केली; त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या.
23निवासमंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यांपैकी वीस दक्षिण बाजूस लावण्यासाठी केल्या.
24त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या; म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी दोन-दोन उथळ्या त्यांनी केल्या.
25त्याचप्रमाणे निवासमंडपाच्या दुसर्‍या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळ्या केल्या;
26त्यांनी त्यांच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या.
27निवासमंडपाच्या मागील म्हणजे पश्‍चिम बाजूसाठी त्यांनी सहा फळ्या केल्या,
28आणि मागील बाजूस निवासमंडपाच्या कोपर्‍यासाठी त्यांनी दोन फळ्या केल्या.
29ह्या फळ्या खालपासून दोन-दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जुळवल्या; दोन्ही कोपर्‍यांसाठी त्यांनी अशा दोन फळ्या केल्या.
30ह्या प्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या, अर्थात एकेका फळीखाली दोन-दोन उथळ्या होत्या.
31त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले, निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
32निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि निवासमंडपाच्या पश्‍चिमेच्या म्हणजे मागील बाजूसाठी पाच;
33आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावायचा मधला अडसर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहचेल असा केला.
34त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले.
35मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब काढवले;
36आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले. ते सोन्याने मढवले; त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी चार चांदीच्या उथळ्या ओतल्या.
37त्यांनी तंबूच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनवला;
38व त्यांनी त्याचे पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढवल्या, आणि त्यांच्या पाच उथळ्या पितळेच्या बनवल्या.

सध्या निवडलेले:

निर्गम 36: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन