YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 9

9
मरीची पीडा
1मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे सांगतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
2तू त्यांना जाऊ देणार नाहीस आणि त्यांना अजूनही अडवून ठेवशील,
3तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल.
4इस्राएलाची गुरेढोरे आणि मिसर्‍यांची गुरेढोरे ह्यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील; इस्राएल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही.”’ 5मग परमेश्वराने वेळ ठरवली आणि म्हटले, “उद्या परमेश्वर ह्या देशात ही गोष्ट करील.”
6दुसर्‍या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही.
7फारोने माणसे पाठवली तर पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांना जाऊ दिले नाही. गळवांची पीडा 8नंतर परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यांना सांगितले की, “भट्टीतली ओंजळभर राख1 घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी.
9मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे ह्यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील.”
10ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले; मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे माणसे व गुरे ह्यांना फोड येऊन गळवे झाली.
11गळवांमुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना कारण जादुगार आणि सर्व मिसरी लोक ह्यांना गळवे आली होती.
12तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.
गारांची पीडा
13परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा, आणि त्याला सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
14नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.
15कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता;
16तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.
17तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय?
18पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही.
19तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण; जी माणसे व गुरे घरी आसर्‍यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील.”’
20फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवत घरी आणली.
21आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास आणि जनावरे रानात राहू दिली.
22मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल; मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल.”
23मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली, आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला; ह्या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.
24ह्याप्रमाणे गारा पडत असता मधूनमधून अग्नीचा लोळ दिसत होता; ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी वृष्टी कधी झाली नव्हती.
25सर्व मिसर देशात माणसे, गुरेढोरे, वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला; शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले.
26मात्र गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत.
27तेव्हा फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “मी ह्या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत.
28तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.”
29मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
30तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तुम्ही आणि तुमचे सेवक परमेश्वर देव ह्याला भीत नाहीत.”
31त्या समयी जवस व सातू ह्यांचा नाश झाला; कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती.
32पण गहू व काठ्यागहू ह्यांचा नाश झाला नाही; कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते.
33मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला.
34पाउस, वृष्टी, गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले.
35फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही; परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते.

सध्या निवडलेले:

निर्गम 9: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन