YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 24

24
कढईचा दाखला
1नंतर नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दशमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, तू ही तारीख, आजची तारीख लिहून ठेव; ह्या तारखेस बाबेलचा राजा यरुशलेमेवर जाऊन पडला आहे.
3ह्या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढव; ती चढवल्यावर तिच्यात पाणी ओत.
4मांड्या व खांदे असे मांसाचे चांगले चांगले तुकडे जमा करून तिच्यात टाक; तिच्यात निवडक हाडे भर.
5कळपातून एक चांगले मेंढरू निवडून घे; हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांची रास कर; ते चांगले शिजू दे; त्यातील हाडेही चांगली शिजू दे.
6ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही; तिच्यातला एकेक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत.
7कारण तिने रक्तपात केला आहे, त्या रक्ताने ती भरली आहे, ते तिने उघड्या खडकावर पडू दिले आहे; धुळीने ते झाकू नये म्हणून तिने ते जमिनीवर पडू दिले नाही.
8संताप येऊन सूड उगवावा ह्यासाठी तिने रक्त पाडले आहे, ते झाकता येऊ नये म्हणून ते उघड्या खडकावर पडावे असे मी केले आहे.
9ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! मी सरपणाचा ढीगही मोठा करीन.
10लाकडे भरपूर घाल, आग चांगली पेटव, मांस चांगले शिजव, रस्सा चांगला घट्ट होऊ दे, हाडेही भाजून काढ.
11मग विस्तवावर कढई रिकामीच ठेव म्हणजे तिचे पितळ तप्त व धगधगीत होऊन तिचा मळ आतल्याआत जळेल, तिचा गंज निघून जाईल.
12ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका.
13तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस.
14मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
यहेज्केलाच्या पत्नीचा मृत्यू
15पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
16“मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस.
17उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”
18सकाळी मी लोकांत हे म्हणालो, आणि संध्याकाळी माझी बायको मेली; तेव्हा मला आज्ञा झाली होती तसे मी दुसर्‍या दिवशी सकाळी केले.
19ह्यावरून लोक मला म्हणाले, “तू हे करतोस त्याचा आमच्याशी काय संबंध आहे ते आम्हांला सांगशील काय?”
20मी त्यांना म्हणालो, “परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की,
21‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.
22मग मी केले आहे तसे तुम्ही कराल, तुम्ही ओठ झाकणार नाही व सुतकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही.
23तुम्ही आपल्या डोक्यांस शिरोभूषणे घालाल, पायांत जोडे घालाल; तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल व एकमेकांना पाहून उसासे टाकाल.
24ह्या प्रकारे यहेज्केल तुम्हांला चिन्हवत होईल; त्याने केले त्याप्रमाणे तुम्ही कराल; हे घडून येईल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.’
25“हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणार्‍या वस्तू, त्यांच्या जिवाचा इष्टविषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्यांच्यापासून हरण करीन;
26त्या दिवशी निभावलेला एखादा माणूस तुझ्या कानावर हे वर्तमान घालण्यास तुझ्याकडे येईल.
27त्या दिवशी त्या निभावलेल्या माणसाबरोबर बोलण्यास तुझे तोंड उघडेल; तू बोलशील, ह्यापुढे तू स्तब्ध राहणार नाहीस; असा तू त्यांना चिन्हवत होशील, म्हणजे त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 24: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन