YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 36

36
इस्राएलाची भावी उर्जितावस्था
1हे मानवपुत्रा, इस्राएलाच्या पर्वतांना संदेश देऊन सांग की, इस्राएलाच्या पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
2प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, ‘अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत;’
3म्हणून संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यांनी तुम्हांला उद्ध्वस्त केले आहे, राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर ताबा बसावा म्हणून त्यांनी तुम्हांला चोहोकडून ग्रासले आहे, आणि तुमचे नाव लोकांच्या तोंडी झाले आहे व त्यांना तुम्ही निंदेचा विषय झाला आहात.
4ह्यास्तव इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; आसपासच्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांना लूट व निंदेचा विषय झालेले पर्वत व टेकड्या, नाले व खोरी, उजाड व ओसाड नगरे ह्यांना प्रभू परमेश्वर असे म्हणतो की,
5राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले व सगळा अदोम ह्यांनी उल्लासयुक्त मनाने व द्वेषबुद्धीने माझा देश लुटून फस्त करण्याच्या हेतूने तो आपल्या सत्तेत घेतला; ह्यास्तव मी त्यांच्याविरुद्ध ईर्ष्यायुक्त होऊन निश्‍चितपणे बोललो आहे.
6इस्राएल देशाविषयी संदेश देऊन पर्वत व टेकड्या, नाले व खोरी ह्यांना सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, परराष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुम्ही साहिली आहे म्हणून, पाहा, मी आपल्या ईर्ष्येने व संतापाने बोललो आहे.
7ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात उचलला आहे; तुझ्याभोवतालची परकी राष्ट्रे खचीत अप्रतिष्ठा पावतील;
8पण इस्राएलाचे पर्वतहो, तुमच्यावरील वृक्षांना फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांना फळे द्याल असे लवकरच घडून येईल.
9कारण पाहा, मी तुम्हांला अनुकूल आहे, मी तुमच्याकडे वळेन व तुमच्यावर नांगरणी-पेरणी होईल.
10मी तुमच्यावर माणसांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन; नगरे वसतील; पडीत स्थळे बांधून काढतील.
11मनुष्य व पशू ह्यांची संख्या मी तुमच्यावर वाढवीन, ते वृद्धी पावून फलद्रूप होतील; पूर्वीच्या काळाप्रमाणे तुमच्यावर वस्ती होईल, आणि सुरुवातीला केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
12माणसे म्हणजे माझे इस्राएल लोक, तुमच्यावर पुन्हा येजा करतील असे मी करीन; ते तुमचा1 ताबा घेतील, तुम्ही त्यांचे वतन व्हाल, तुम्ही2 इतःपर त्यांना अपत्यहीन करणार नाही.
13प्रभू परमेश्वर म्हणतो : ते तुम्हांला म्हणत की, ‘तू मनुष्यभक्षक देश आहेस, तू आपल्या राष्ट्रांस अपत्यहीन केले आहेस;’
14तर तू ह्यापुढे माणसे भक्षणार नाहीस, आपल्या राष्ट्रापुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
15इत:पर मी तुला राष्ट्रांची निंदा ऐकवणार नाही, राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुला सोसावी लागणार नाही, तू आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
16परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की,
17“मानवपुत्रा, इस्राएल घराणे देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतींनी तो देश भ्रष्ट केला; त्यांचा आचार माझ्यासमक्ष ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे होता.
18त्यांनी देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तींनी तो भ्रष्ट केला म्हणून मी देशावर आपल्या संतापाचा वर्षाव केला.
19मी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग केली, देशोदेशी त्यांची दाणादाण झाली; त्यांच्या आचाराप्रमाणे व कृतींप्रमाणे मी त्यांचा न्याय केला.
20ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की, ‘हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.’
21परंतु इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत गेले तेथे तेथे त्याने माझ्या पवित्र नामास बट्टा लावला, तेव्हा मी आपल्या नामास जपलो.
22ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, मी हे तुमच्याकरता करत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामाप्रीत्यर्थ मी हे करत आहे.
23तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले, ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांदेखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
24कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन.
25मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.
26मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन.
27मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.
28मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल, आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल.
29मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हांला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.
30वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.
31तुम्हांला आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल; तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये ह्यांमुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल.
32प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मी तुमच्याकरता करीत नाही हे तुम्हांला ठाऊक असू द्या; हे इस्राएल घराण्या, तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजीत व्हा.
33प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांला स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन.
34आल्यागेल्यास वैराण दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल.
35तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’
36जी राष्ट्रे तुमच्यासभोवती निभावून राहतील त्यांना समजेल की मी परमेश्वर उद्ध्वस्त झालेली स्थाने बांधून काढतो. उजाड झालेल्याची लागवड करतो. मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच.
37प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन.
38पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरुशलेमेतील सणाचा कळप ह्यांप्रमाणे ओसाड नगरे मनुष्याच्या कळपांनी भरून जातील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 36: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन