उत्पत्ती 24
24
इसहाकासाठी पत्नी मिळवणे
1अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतींत आशीर्वादित केले होते.
2अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.
3मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.
4तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”
5त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदाकदाचित नवरी माझ्याबरोबर ह्या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय?”
6तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यायचे नाही.
7स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.
8पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू ह्या माझ्या शपथेतून मोकळा होशील; मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.”
9तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली.
10मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला; त्याच्याजवळ त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या; तो अराम-नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला.
11संध्याकाळी स्त्रिया पाणी भरायला बाहेर पडतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले,
12आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर.
13पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत.
14तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.”
15त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधू नाहोर ह्याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल ह्याला झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली.
16ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली.
17तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.”
18ती म्हणाली, “प्या, बाबा;” आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरवून घेऊन त्याला पाणी पाजले.
19त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.”
20मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचवली व पुन: पाणी आणायला ती विहिरीकडे धावत गेली; असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले.
21तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला; परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे ह्याचा विचार करत तो स्तब्ध राहिला.
22उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या,
23आणि तो म्हणाला, “तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग; तुझ्या बापाच्या घरी आम्हांला उतरायला जागा आहे काय?”
24ती त्याला म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या.” ती आणखी त्याला म्हणाली,
25“आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे, आणि उतरायला जागाही आहे.”
26तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले.
27तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.”
28तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यांना ही हकिकत कळवली.
29रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते; तो विहिरीजवळ त्या मनुष्याकडे धावत गेला.
30त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातांतल्या बांगड्या पाहिल्या आणि, ‘मला तो मनुष्य असे असे म्हणाला,’ हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तर उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे.
31तेव्हा त्याने म्हटले, “अहो, या; परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. आपण बाहेर का उभे आहात? मी आपणा-साठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे.”
32मग तो मनुष्य घरी आला; आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यांना पेंढावैरण दिली, आणि त्याला व त्याच्या बरोबरच्या माणसांना पाय धुण्यास पाणी दिले.
33त्याच्यापुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, “मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही.” तेव्हा त्याने म्हटले, “सांगा.”
34तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.
35परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.
36माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याच्यापासून मुलगा झाला, त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे.
37आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस;
38तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलासाठी नवरी पाहून आण.
39तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी माझ्याबरोबर कदाचित येणार नाही.
40तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो, तो आपला दूत तुझ्याबरोबर पाठवील व तुझा प्रवास सफळ करील, आणि तू माझ्या आप्तांतून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी नवरी आण;
41तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील; मुलगी देण्यास ते कबूल झाले नाहीत तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.
42मी आज विहिरीजवळ आलो तेव्हा म्हणालो, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर,
43पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे; तर असे घडून येवो की, पाणी भरायला जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला पाज;
44आणि ती मला म्हणेल, “तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते,” तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमलेली आहे असे ठरो.
45माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले; मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे.
46तिने लागलीच आपल्या खांद्यावरून घागर उतरवून म्हटले, तू पी व तुझ्या उंटांनाही मी पाजते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटांनाही पाणी पाजले.
47मग मी तिला विचारले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी; तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातांत बांगड्या घातल्या.
48मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर ह्याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले.
49तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.”
50ह्यावर लाबान व बथुवेल ह्यांनी उत्तर केले. “ही परमेश्वराची योजना आहे; तुम्हांला आमच्याने बरेवाईट काही बोलवत नाही.
51पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे; तिला घेऊन जा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.”
52अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले.
53मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या.
54मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालवली; सकाळी उठल्यावर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे जायला मला निरोप द्या.
55हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, “मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल,”
56पण तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका; मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या.”
57तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ते विचारू.”
58त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, “तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय?” ती म्हणाली, “जाते.”
59मग त्यांनी त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे ह्यांची रवानगी केली.
60त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्यांच्या नगरांची सत्ता पावो.”
61मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या; ह्याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला.
62इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे.
63इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले.
64रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली.
65तिने त्या सेवकाला विचारले, “हा रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण?” सेवक म्हणाला, “हा माझा धनी.” तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले.
66मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले.
67मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेर्यात आणले, त्याने रिबकेचा स्वीकार केला. ती त्याची पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते; आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला.
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 24: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.