उत्पत्ती 31
31
याकोब लाबानाच्या घरून पळून जातो
1नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की, आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे, आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळवली आहे.
2लाबान पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले.
3परमेश्वराने याकोबाला सांगितले की, “तू आपल्या पूर्वजांच्या देशी, आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन.”
4तेव्हा याकोबाने राहेल व लेआ ह्यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलावले.
5त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे.
6मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हांला ठाऊक आहे;
7तरी तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही.
8त्याने जेव्हा म्हटले की, ‘ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुला वेतनादाखल मिळतील,’ तेव्हा सर्व कळपांना ठिपकेदार पोरे होऊ लागली; त्याने जेव्हा म्हटले की, ‘बांड्या तुझ्या,’ तेव्हा सर्व कळपांना बांडी पोरे होऊ लागली.
9ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत.
10कळप फळायच्या ऋतूत मी स्वप्नात आपली दृष्टी वर करून पाहिले तो मेंढ्यांवर उडणारे एडके बांडे, ठिपकेदार व करडे होते.
11तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, “याकोबा”; मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”
12तो म्हणाला, “आपली दृष्टी वर करून पाहा; मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे, ठिपकेदार व करडे आहेत; लाबान तुझ्याशी कसा वागत आहे हे मी पाहिले आहे.
13बेथेल येथे तू एका स्तंभाला अभ्यंग करून मला नवस केला तेथला मी देव आहे; आता ह्या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा.”
14तेव्हा राहेल व लेआ त्याला म्हणाल्या, “आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आमच्यासाठी थोडेच ठेवले आहे?
15त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हांला विकून टाकले आहे, आणि आमचे धनही खाऊन टाकले आहे.
16ह्यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे; तर आता देवाने आपल्याला सांगितले आहे तसे करा.”
17मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका ह्यांना उंटांवर बसवले;
18आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन-अरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसहाक ह्याच्याकडे कनान देशास जायला निघाला.
19लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम (गृहदेवता) चोरल्या.
20ह्याप्रमाणे याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण पळून जात आहोत हे त्याने त्याला कळू दिले नाही.
21मग तो आपले सर्वकाही घेऊन पळून गेला; तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखवला.
लाबान याकोबाचा पाठलाग करतो
22याकोब पळून गेला हे तिसर्या दिवशी कोणीतरी लाबानास सांगितले.
23तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा सात दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठले.
24देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.”
25लाबानाने याकोबाला गाठले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता; लाबानानेही आपल्या भाऊबंदांसह गिलाद डोंगरात डेरा दिला.
26मग लाबान याकोबाला म्हणाला, “तू हे काय केलेस? तू मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास.
27तू चोरून पळालास, मला फसवलेस, काही कळू दिले नाहीस, असे का केलेस? तू मला कळवले असतेस तर मी आनंदाने गाणेबजावणे करून, डफ, चंग वगैरे वाद्ये लावून तुला रवाना केले असते.
28तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाहीस; हा सर्व तू मूर्खपणा केलास.
29तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की, सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.
30बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्यास?”
31तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटली; मी म्हणालो, कोण जाणे आपण माझ्याकडून आपल्या मुली हिरावून घ्याल.
32आपल्या देवता ज्याच्याजवळ सापडतील तो जिवंत राहायचा नाही; आपण आपल्या भाऊबंदांदेखत माझी झडती घेऊन आपले काही सापडेल तर ओळखून खुशाल घ्या.” कारण राहेलीने देवता चोरून आणल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते.
33तेव्हा लाबान याकोबाच्या डेर्यात, लेआच्या डेर्यात आणि त्या दोन दासींच्या डेर्यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेर्यातून राहेलीच्या डेर्यात गेला.
34राहेल त्या गृहदेवता घेऊन व उंटाच्या कंठाळीत ठेवून त्यांवर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिला पण त्याला काही सापडले नाही.
35ती बापाला म्हणाली, “स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे.” अशा प्रकारे त्याने शोध केला; पण त्याला त्या गृहदेवता सापडल्या नाहीत.
36तेव्हा याकोब रागावला. लाबानाशी तक्रार करू लागला; याकोबाने लाबानाला म्हटले, “आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले?
37आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली त्यांत आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या ह्या माझ्या व आपल्या भाऊबंदांसमोर ठेवा; म्हणजे त्यांना आपल्या दोघांचा निवाडा करता येईल.
38आज वीस वर्षें मी आपल्याजवळ राहिलो; इतक्या काळात आपल्या शेळ्यामेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत.
39वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरून दिली; दिवसा-रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतलीत.
40दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा ह्यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्यांची झोप उडे, अशी माझी दशा होती.
41गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला.
42माझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक’ (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.”
याकोब व लाबान ह्यांच्यात सलोखा
43ह्यावर लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या मुली आहेत, आणि ही मुले माझी मुले आहेत; हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे; आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले ह्यांना मी काय करू?
44तर चल, तू आणि मी आपसात करार करू; आणि तो तुझ्यामाझ्यामध्ये साक्ष होवो.”
45तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला.
46मग याकोब आपल्या भाऊबंदांना म्हणाला, “धोंडे जमा करा,” आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली; आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले.
47लाबानाने त्या राशीस यगर-सहदूथा (अरेमाईक भाषेत साक्षीची रास) म्हटले व याकोबाने तिला गलेद (हीब्रू भाषेत साक्षीची रास) म्हटले.
48लाबान म्हणाला, “आता ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव ‘गलेद’ ठेवले.”
49तसेच ‘मिस्पा’ हेही नाव तिला दिले; तो म्हणाला, “कारण आपण परस्परांच्या दृष्टिआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा-माझा साक्षी असो.
50तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.”
51लाबान याकोबाला आणखी म्हणाला, “पाहा, तुझ्यामाझ्यामध्ये ही रास व हा स्तंभ मी उभा केला आहे.
52ही रास व हा स्तंभ साक्षी असो; अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझ्याकडे येणार नाही. तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्याकडे येऊ नयेस.
53अब्राहामाचा देव, नाहोराचा देव व त्यांच्या पित्याचे1 देव आपल्या दोघांचा न्याय करोत.” मग याकोबाने आपला बाप इसहाक ह्याचा जो ‘धाक’ त्याची शपथ वाहिली.
54नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली.
55लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 31: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.