उत्पत्ती 49
49
आपल्या मुलांविषयी याकोबाने केलेले भाकीत
1मग याकोबाने आपल्या मुलांना बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व एकत्र जमून या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हांला सांगतो.
2याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका; तुमचा बाप इस्राएल ह्याच्याकडे कान द्या.
3रऊबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथमफळ आहेस; प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच.
4तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केलीस. तो माझ्या शय्येवर चढला.
5शिमोन व लेवी हे भाऊ आहेत; त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत.
6माझ्या जिवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको; माझ्या शीला, त्यांच्या मंडळात सामील होऊ नको; कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला; त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.
7त्यांच्या रागाचा धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे; त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे; मी त्यांची याकोबात पांगापांग करीन, इस्राएलात त्यांना विखरीन.
8हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील.
9यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?
10यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.
11तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील; तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल.
12त्याचे नेत्र द्राक्षारसाने आरक्त होतील; त्याचे दात दुधाने शुभ्र होतील.
13जबुलून सागरतीरी वस्ती करील; तो जहाजांचे बंदरच होऊन राहील; त्याची सरहद्द सीदोनापर्यंत जाईल.
14इस्साखार दणकट गाढव आहे; तो मेंढवाड्यांच्या दरम्यान दबा धरून बसतो;
15विश्रांतीला हे चांगले स्थल आहे, हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकवला; तो बिगारकाम करणारा दास बनला.
16दान इस्राएलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करील.
17दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल, हा घोड्याच्या टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरील स्वार उलथून मागे पडतो.
18हे परमेश्वरा, मी तुझ्याकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करत आहे.
19गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील; तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.
20आशेराचे अन्न पौष्टिक होईल तो राजाला योग्य अशी मिष्टान्ने पुरवील.
21नफताली हा मोकळी सुटलेली हरिणीच होय. तो सुंदर भाषणे करणारा होईल.
22योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहळ्या भिंतीवर पसरल्या आहेत.
23तिरंदाजांनी त्यांना त्रस्त केले, त्याला बाण मारले, त्याचा पिच्छा पुरवला;
24तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले.
25तुझे साहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्वसमर्थ देव ह्याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल, अंगावर पिणार्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल.
26तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहेत; ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणार्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत; हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, आपल्या भाऊबंदांत जो प्रमुख त्याच्या शिरी येवोत.
27बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील.”
28हे सगळे इस्राएलाचे बारा वंश आहेत. त्यांचा बाप त्यांना आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच; प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आशीर्वादाप्रमाणे त्याने आशीर्वाद दिला.
याकोबाचा मृत्यू व त्याचे दफन
29मग त्याने त्यांना आज्ञा केली की, “मी आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांजवळ पुरा.
30कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्राहामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही.
31तेथेच अब्राहाम व त्याची स्त्री सारा ह्यांना पुरले; इसहाक व त्याची स्त्री रिबका ह्यांनाही तेथे पुरले; तेथेच मी लेआलाही पुरले.
32ते शेत व त्यांतील गुहा ही हेथींकडून खरेदी केली आहेत.”
33आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपवल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 49: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.