यशया 41
41
इस्राएलाला देवाचे आश्वासन
1अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू.
2ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो.
3तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो.
4हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्यांनाही तो मीच आहे.
5द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली.
6त्यांतील प्रत्येकाने आपापल्या सोबत्याला साहाय्य केले, प्रत्येक आपल्या बंधूस म्हणाला, “हिंमत धर.”
7ओतार्याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्याने ऐरणीवर घण मारणार्याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.
8माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना,
9मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”;
10तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.
11पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.
12तुझ्याशी लढणार्यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत; तुझ्याशी युद्ध करणार्यांचा नायनाट होईल.
13कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”
14हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.
15पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील.
16तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.
17दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.
18मी उजाड टेकड्यांवर नद्या व खोल दर्यांतून झरे वाहवीन; मी अरण्य पाण्याचे तळे व निर्जल प्रदेश झरे करीन.
19अरण्यात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी व कण्हेर ह्यांची लावणी करीन व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन.
20येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे.
खोट्या दैवतांना परमेश्वराचे आव्हान
21परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा.
22ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हांला कळवा; प्रथम घडणार्या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू; अथवा पुढे होणार्या गोष्टी आम्हांला ऐकवा.
23पुढे काय होईल ते कळवा म्हणजे तुम्ही देव आहात असे आम्ही समजू; तुम्ही बरेवाईट काहीतरी करा, म्हणजे आम्ही तत्काळ चकित होऊन1 त्याकडे पाहू.
24पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय.
25मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील.
26आम्हांला समजावे म्हणून हे प्रारंभापासून कोणी प्रकट केले? “तो न्यायी आहे” असे आम्ही म्हणावे म्हणून पूर्वकालापासून कोणी सांगितले? हे कोणीच कळवले नाही; कोणी हे ऐकवले नाही; कोणी तुमचे शब्द ऐकले नाहीत.
27मीच प्रथम सीयोनेस म्हणालो, “हे पाहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमला आहे.”
28मी पाहतो तर कोणी दिसेना; मी विचारतो तर त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही.
29पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.
सध्या निवडलेले:
यशया 41: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.