शास्ते 14
14
शमशोन आणि तिम्ना येथील स्त्री
1शमशोन तिम्ना येथे गेला; तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली.
2तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे; ती मला बायको करून द्या.”
3त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.”
4पलिष्ट्यांना विरोध करण्याची संधी मिळावी म्हणून ही गोष्ट परमेश्वर करत आहे हे त्याच्या आईबापांच्या लक्षात आले नाही. त्या काळी इस्राएलावर पलिष्ट्यांची सत्ता होती.
5शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यांजवळ येऊन पोहचला तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला.
6तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला, आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.
7मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले; ती शमशोनाला फार आवडली.
8काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला तेव्हा त्यात मधमाश्यांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला.
9त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खातखात गेला. आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला; तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही.
10मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला; तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये तशी प्रथा होती.
11तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस तीस लोक आणले.
12शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला एक कोडे घालतो. मेजवानीच्या सात दिवसांत ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हांला तीस तागे व तीस पोशाख देईन.
13पण तुम्हांला ते उलगडता आले नाही तर तुम्ही मला तीस तागे व तीस पोशाख द्यावेत.” त्यांनी त्याला म्हटले, “सांग तुझे कोडे; आम्हांला ऐकू तर दे.”
14मग तो त्यांना म्हणाला, “भक्षकातून भक्ष्य व उग्रातून मधुर ते काय?” तीन दिवसपर्यंत त्यांना त्या कोड्याचा अर्थ उलगडला नाही.
15चवथ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, “तू आपल्या नवर्याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगायला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या घराला जाळून टाकू. तुम्ही आम्हांला लुबाडायला येथे बोलावले आहे, असेच ना?”
16नंतर शमशोनाची बायको त्याच्यापुढे रडत म्हणू लागली, “तुमचे माझ्यावर प्रेम नाही; तुम्ही माझा केवळ द्वेष करता. माझ्यावर प्रीती करत नाही. माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले, पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही.” तो तिला म्हणाला, “हे पाहा, मी ते माझ्या आईवडिलांनाही सांगितले नाही, तर ते काय तुला सांगू?”
17मेजवानीच्या सातव्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने सातव्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले.
18सातव्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड ते काय? आणि सिंहापेक्षा उग्र ते काय?” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हांला माझे कोडे कधीच उलगडले नसते.”
19मग परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि तो अष्कलोनाला गेला. तेथली तीस माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले; आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला.
20इकडे शमशोनाच्या सोबत्याला त्याची बायको देण्यात आली.
सध्या निवडलेले:
शास्ते 14: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.