YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 13

13
ईयोब आपल्या नीतिमत्त्वाचे समर्थन करतो
1“पाहा, हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलेच आहे, माझे कान हे ऐकून समजलेच आहेत.
2तुम्हांला कळते ते मलाही कळते; मी काही तुमच्याहून कमी नाही.
3खचीत मी सर्वसमर्थाशी बोलणार; मी देवापुढे वाद चालवू इच्छितो.
4तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात.
5अहो! तुम्ही अगदी गप्प राहाल तर बरे; ह्यात तुमचा शहाणपणा दिसेल.
6आता माझे म्हणणे ऐकून घ्या; माझ्या तोंडच्या प्रतिवादाकडे कान द्या.
7काय? तुम्ही देवाच्या पक्षाने विपरीत भाषण करता? त्याच्या पक्षाने कपटभाषण करता?
8तुम्ही त्याचे पक्षपाती होणार काय? देवाची वकिली करणार काय?
9तुमची त्याने पारख केली तर ते तुम्हांला बरे वाटेल काय? मनुष्य मनुष्याला फसवतो तसे तुम्ही त्याला फसवाल काय?
10तुम्ही कपटाने पक्षपात कराल तर तो खातरीने तुमचे करणे उघडकीस आणील.
11त्याच्या माहात्म्याने तुम्ही घाबरे होणार नाही काय? त्याचा धाक तुम्हांला वाटणार नाही काय?
12ही कर्णोपकर्णी आलेली तुमची वचने केवळ राखेच्या म्हणी होत; तुमचे कोट केवळ मातीचे होत.
13गप्प राहा, माझ्याआड येऊ नका म्हणजे मी बोलेन; मग काय होईल ते होवो.
14मी आपले मांस दाती का धरावे? मी आपला प्राण मुठीत का धरावा?
15तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन.
16ह्यातच माझे तारण होईल; कारण भक्तिहीन त्याच्यासमोर येणार नाही.
17अहो, चित्त देऊन माझे भाषण ऐका; माझे म्हणणे तुमच्या कानी पडू द्या.
18आता पाहा, मी आपल्या दाव्याची पुरी तयारी केली आहे; मी निर्दोष ठरेन हे मला माहीत आहे.
19माझा कोण प्रतिवादी होईल? कोणी झाला तर मी गप्प राहून प्राण सोडीन.
20दोनच गोष्टी मात्र करू नकोस, म्हणजे मग मी तुझ्यापासून तोंड लपवणार नाही. माझ्यावरला आपला हात काढ,
21आणि मला धाक घालून घाबरे करू नकोस.
22मला बोलाव, म्हणजे मी बोलेन, नाहीतर मी बोलतो आणि मग तू त्याचे उत्तर दे.
23माझी अधर्मकृत्ये व माझी पातके किती आहेत! माझा अपराध व माझे पाप मला दाखवून दे.
24तू आपले तोंड का लपवतोस? मला आपला वैरी का लेखतोस?
25इकडून तिकडे उडणार्‍या पानांचा तू पिच्छा पुरवतोस काय? शुष्क भुसाच्या पाठीस लागतोस काय?
26तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस, माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगायला लावतोस.
27तू माझे पाय खोड्यांत घालतोस आणि माझ्या सगळ्या चालचलणुकीवर नजर ठेवतोस; तू माझ्या पावलांभोवती रेषा मारतोस.
28मी सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे.”

सध्या निवडलेले:

ईयोब 13: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन