योएल 2
2
1सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.
2अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.
3त्यांच्यापुढे अग्नी भस्म करत चालला आहे, त्यांच्यामागे ज्वाला जाळत चालली आहे, त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड रान आहे; त्यातून काहीच वाचून राहत नाही.
4त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे. स्वारांसारखे ते धावतात.
5ते उड्या टाकतात, त्यांचा आवाज डोंगरमाथ्यांवरून जाणार्या रथांच्या आवाजासारखा आहे; धसकट खाऊन टाकणार्या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करतात; युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत.
6त्यांच्यापुढे राष्ट्रे व्यथित होतात, सर्वांची तोंडे काळवंडतात.
7वीरांप्रमाणे ते धावतात, योद्ध्यांप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करतात, ते आपली दिशा सोडत नाहीत.
8ते एकमेकांना रेटून चालत नाहीत; ते आपापल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यांतून पार जातात.
9ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.
10त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.
11परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करतो; कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे; त्याचा हुकूम बजावणारा बलवान आहे; परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?
परमेश्वराची दया
12“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”
13आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.
14परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.
15सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा.
16लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा; वडिलांना जमवा; मुले व स्तनपान करणारी अर्भके ह्यांनाही एकत्र करा; वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत.
17देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’
18तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.
19परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.
20उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.
21अगे भूमी, भिऊ नकोस; उल्लास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत.
22वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्त्व देत आहेत.
23सीयोनपुत्रहो, परमेश्वर तुमचा देव ह्याच्या ठायी उल्लास करा, हर्ष करा; कारण तुम्हांला हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस1 तो देतो; तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.
24मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील.
25मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.
26तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही.
27तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.
देवाच्या आत्म्याचा वर्षाव
28ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.
29तुमचे दास व दासी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.
30मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन.
31परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
32तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल; कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यांत राहतील.
सध्या निवडलेले:
योएल 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.