योना 4
4
योनाचा असंतोष व देवाची दया
1ह्याचे योनाला फार वाईट वाटले व त्याला राग आला.
2तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.
3तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.”
4तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?”
5मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला; तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला.
6परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगववला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. ह्या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला.
7पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला; तो त्या तुंबीला लागला, तेव्हा ती सुकून गेली.
8मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”
9तेव्हा देव योनाला म्हणाला, “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.”
10परमेश्वर म्हणाला, “ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस!
11तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”
सध्या निवडलेले:
योना 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.