यहोशवा 10
10
अमोरी लोकांचा पराभव
1यहोशवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले; पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी तह करून त्यांच्यामध्ये आहेत, हे यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने ऐकले;
2तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते; ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते.
3मग यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर ह्यांना निरोप पाठवला की, 4“माझ्याकडे येऊन मला कुमक द्या, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी तह केला आहे.”
5तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले.
6हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नकोस; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.”
7तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर ह्यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.
8परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
9यहोशवा रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला.
10परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
11ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.
12परमेश्वराने अमोर्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्यावर स्थिर हो.”
13तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
14असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
15मग यहोशवा सर्व इस्राएलांसह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
16ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
17“मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत” असे यहोशवाला कोणी कळवले.
18तेव्हा यहोशवा म्हणाला, “गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा;
19पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना पोहचू देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.”
20यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक वाचून तटबंदीच्या नगरात गेले.
21मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाच्याही विरुद्ध कोणी एक शब्ददेखील उच्चारला नाही.
22मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
23त्याप्रमाणे त्यांनी केले म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
24ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, “पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले.
25यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिंमत धरा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे परमेश्वर असेच करील.”
26नंतर यहोशवाने त्यांना ठार मारवून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर लटकत राहिले.
27सूर्यास्तसमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरवले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. ते आजपर्यंत तसेच आहेत.
28त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
29मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलाला बरोबर घेऊन यहोशवा लिब्नावर चालून गेला व त्याच्याशी लढला;
30परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
31त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला आणि त्याच्यासमोर तळ देऊन त्याच्याशी लढला.
32परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसर्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तलवारीने संहार केला.
33तेव्हा गेजेराचा राजा होराम लाखीशाला कुमक देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा संहार केला की त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.
34मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्याच्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
35त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
36मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला, आणि ते त्याच्याशी लढले;
37त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यांतले सर्व प्राणी ह्यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला.
38नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरावर चालून गेला आणि त्याच्याशी लढला.
39त्याने ते, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला आणि तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत राहू दिले नाही; हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले.
40ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.
41यहोशवाने कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलुख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत ह्यात त्यांचा धुव्वा उडवला.
42हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला.
43मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथे छावणीकडे परतला.
सध्या निवडलेले:
यहोशवा 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.