यहूदा 1
1
नमस्कार
1देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :
2दया, शांती व प्रीती ही तुम्हांला विपुल मिळोत.
खोटे शिक्षक व नैतिक अध:पात ह्यांबाबत सूचना
3प्रियजनहो, आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हांला लिहायची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हांला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले.
4कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.
5तुम्हांला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हांला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे; ते हे की, प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले, आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला;
6आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.
7त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.
8तसेच हेदेखील विषयस्वप्नांत देहाला विटाळवतात, आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात.
9आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला.
10तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावत: समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात.
11त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.
12ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक1 असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत;
13ते लज्जारूपी फेस दाखवणार्या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.
14,15आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”1
16ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत; तोंडाने ते फुशारकी मारतात; व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.
17परंतु प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा;
18ते तुम्हांला असे सांगत असत की, “शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.”
19ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत.
20प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
21सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा.
22जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा,
23त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.
24तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,
25अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, (येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे) गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.
सध्या निवडलेले:
यहूदा 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.