YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 18

18
अनैतिक आचरण वर्ज्य
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांग की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
3तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका; तसेच ज्या कनान देशात मी तुम्हांला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका.
4माझ्याच नियमांप्रमाणे चाला, आणि माझेच विधी पाळा म्हणजे त्याप्रमाणे वागा; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
5म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावेत; ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील; मी परमेश्वर आहे.
6तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करण्यास जवळ जाऊ नये; मी परमेश्वर आहे.
7तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नकोस. ती तुझी आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नकोस.
8आपल्या सावत्र आईची कायाही उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाचीच काया होय.
9आपली बहीण, मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नकोस.
10आपली नात, मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, तिची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझीच काया होय.
11तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे म्हणून तिची काया उघडी करू नकोस.
12आपल्या आत्याची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय.
13आपल्या मावशीची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची आप्त होय.
14आपल्या चुलत्याची काया उघडी करू नकोस, म्हणजे त्याच्या बायकोशी गमन करू नकोस, ती तुझी चुलती होय.
15आपल्या सुनेची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या मुलाची बायको होय; तिची काया उघडी करू नकोस.
16आपल्या भावजयीची काया उघडी करू नकोस, ती तुझ्या भावाचीच काया होय.
17एखाद्या स्त्रीची आणि तिच्या मुलीची अशा दोघींचीही काया उघडी करू नकोस, तिची नात, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो अथवा मुलीची मुलगी असो, तिला आपली बायको करून घेऊन तिची काया उघडी करू नकोस; त्या जवळच्या आप्त होत; असे करणे अतिदुष्टपणा होय.
18तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नकोस, ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नकोस,
19स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नकोस.
20तू आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नकोस.
21आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नकोस, ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नकोस, मी परमेश्वर आहे.
22स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नकोस, हे अमंगळ कृत्य होय.
23कोणत्याही पशूशी गमन करून त्याच्यासह अशुद्ध होऊ नकोस; स्त्रीने पशूशी गमन करण्यास त्याच्यापाशी जाऊ नये, हे विपरीत कृत्य होय.
24असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरून घालवणार आहे, ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत.
25त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे.1
26ह्याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत. स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यांच्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत;
27कारण तुमच्यापूर्वी ह्या देशात राहणार्‍या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्ये केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे.
28तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3
29जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
30ही जी आज्ञा मी तुम्हांला केली आहे, ती तुम्ही पाळावी; तुमच्यापूर्वी प्रचलित असलेल्या अमंगळ चालीरीतींप्रमाणे तुम्ही चालू नये व त्यांच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

सध्या निवडलेले:

लेवीय 18: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन