मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.” मग येशू कफर्णहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला ‘जा’ म्हटले की तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो,” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले. “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
मत्तय 8 वाचा
ऐका मत्तय 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 8:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ