मत्तय 8
8
कुष्ठरोग्याला बरे करणे
1मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले.
2आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
3तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.
4मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”
शताधिपतीचा चाकर
5मग येशू कफर्णहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला,
6“प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.”
7येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.”
8तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
9कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला ‘जा’ म्हटले की तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले की तो ते करतो.”
10हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही.
11मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील;
12परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
13मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो,” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी
14नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले.
15तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली.
16मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले.
17“त्याने स्वत: आमचे विकार घेतले
आणि आमचे रोग वाहिले,”
असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
शिष्य होऊ इच्छिणार्यांची कसोटी
18मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली.
19तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
20येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.”
21मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरण्यास जाऊ द्या.”
22येशूने त्याला म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांस पुरू दे.”
वादळ शांत करणे
23मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले.
24तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; परंतु तो झोपेत होता.
25तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो.”
26तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले.
27तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!”
गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त
28मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.
29तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?”
30तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.
31मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, “तू जर आम्हांला काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.”
32त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला.
33मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले.
34तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटण्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली.
सध्या निवडलेले:
मत्तय 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.