YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14

14
येशूला धरण्याविषयी अधिकार्‍यांची गुप्त मसलत
1मग दोन दिवसांनंतर ‘वल्हांडण व बेखमीर भाकरी’चा सण होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते;
2कारण ते म्हणत होते, “आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांत दंगल होईल.”
बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
3तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली.
4तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?”
5कारण “हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते.” अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते.
6परंतु येशू म्हणाला, “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.
7गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही.
8हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे.
9मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.”
यहूदाची फितुरी
10नंतर त्या बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्कर्योत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला.
11त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले; तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोईस्कर संधी पाहू लागला.
शेवटले भोजन
12बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
13मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा, म्हणजे कोणीएक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल; त्याच्यामागून जा.
14तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा : ‘गुरूजी विचारतात मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे?’
15मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा.”
16मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
17मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला.
18आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.”
19ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?”
20तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच.
21मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.”
22ते भोजन करत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.”
23आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले.
24तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे.
25मी तुम्हांला खचीत सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही.”
26मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले.
शिष्य आपल्याला सोडून जातील हे येशूचे भविष्य
27नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व जण आज रात्री माझ्यामुळे अडखळून पडाल; कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’
28तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्यापुढे मी गालीलात जाईन.”
29पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.”
30येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री, कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31तरी तो फार आवेशाने बोलत राहिला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही.” सर्व जणही तसेच म्हणत होते.
गेथशेमाने बागेत येशू
32नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
33त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला.
34तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या जिवाला’ मरणप्राय ‘अति खेद झाला आहे;’ तुम्ही येथे राहा व जागृत असा.
35मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.’
36आणि तो म्हणत होता, “अब्बा, बापा, तुला सर्वकाही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
37मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; तेव्हा तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागे राहवले नाही काय?
38तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.”
39त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.
40मग पुन्हा येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत; त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना.
41पुन्हा तिसर्‍या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले; घटका आली आहे; पाहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे.
42उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
येशूला अटक
43तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली.
44त्याला धरून देणार्‍याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.”
45तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले.
46तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली.
47त्याच्याशेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला.
48तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय?
49मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.”
50तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले.
51तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले;
52परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला.
प्रमुख याजकासमोर येशूची चौकशी
53नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले; आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले.
54पेत्र दुरून त्याच्यामागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55मुख्य याजक व सर्व न्यायसभा ह्यांनी येशूला जिवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला पण ती त्यांना मिळेना.
56बर्‍याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना.
57काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,
58“हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.”
59परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता.
60तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?”
61तथापि तो उगाच राहिला; त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, “धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?”
62येशू म्हणाला, “मी आहे; आणि तुम्ही ‘मनुष्याचा पुत्र सर्वसामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला’ व ‘आकाशातील मेघांसह येत असेलला’ असा पाहाल.”
63तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, “आपणांला साक्षीदारांची आणखी काय गरज?
64हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे; तुम्हांला कसे वाटते?” तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले.
65मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता दाखव आपले अंतर्ज्ञान!” आणि कामदारांनी त्याला चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.
पेत्र येशूला नाकारतो
66इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली;
67आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.”
68परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला.
69मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.”
70तरी त्याने पुन्हा नाकारले; मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखरच त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालीली आहेस [व तुझी बोलीही तशीच आहे.]”
71परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.”
72तत्क्षणी दुसर्‍यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले; तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला.

सध्या निवडलेले:

मार्क 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन