नहूम 2
2
1चुराडा करणारा तुझ्यासमोर चढाई करून आला आहे; कोटाचे संरक्षण कर, मार्गाची टेहळणी कर, आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळाने सज्ज हो.
2कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे.
3त्यांच्या वीरांची ढाल तांबडी आहे; लढवय्ये किरमिजी पोशाख ल्यायले आहेत; सज्ज होण्याच्या दिवशी त्यांच्या रथांचे पोलाद अग्नीसारखे चमकत आहे. ते भाले इकडून तिकडे परजत आहेत.
4रस्त्यांतून रथ बेफाम चालले आहेत, सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत, ते मशालीसारखे दिसत आहेत, ते विजेसारखे धावत आहेत.
5तो आपल्या सरदारांची पाहणी करत आहे, ते वाटेने ठोकरा खात आहेत, ते उतावळीने तटाकडे जात आहेत, तेथे मोर्चा उभारला आहे.
6नदीकडील दरवाजे खुले केले आहेत; राजवाडा कोसळला आहे.
7हुस्सब उघडी झाली आहे,1 तिला नागवून धरून नेले आहे; तिच्या दासी पारव्यांसारख्या घुमत आहेत व आपले ऊर बडवून आकांत करत आहेत.
8निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती; तरी आता ते पळून जात आहेत; ते “थांबा हो थांबा,” असे ओरडतात, पण कोणी मागे वळून पाहत नाही.
9चांदी लुटा! सोने लुटा! सर्व तर्हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे.
10ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे; तिच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे, तिचे गुडघे लटपटत आहेत, सर्वांच्या कंबरेत कळा निघत आहेत, त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत.
11सिंहांची गुहा कोठे आहे? तरुण सिंहांची खुराक खाण्याची जागा कोठे आहे? जेथे सिंह, सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यांना भेडसावत नसे ते ठिकाण कोठे आहे?
12सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबत असे, तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुंफा भरत असे.
निनवेचा समूळ नाश
13पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.
सध्या निवडलेले:
नहूम 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.