नीतिसूत्रे 16
16
जीवन आणि वर्तणूक ह्यांसंबधीची सूत्रे
1मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
2मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.
3आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.
4परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.
5प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो.
6दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.
7मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो.
8अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे.
9मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो.
10दैवी निर्णय राजाच्या ओठी असतात, न्याय करताना त्याचे मुख अन्याय करीत नाही.
11खरी तागडी व खरी पारडी परमेश्वराची आहेत; पिशवीतील सर्व वजने त्याचीच आहेत.
12दुष्कर्मे करणे राजांना अमंगल आहे; कारण गादी नीतिमत्तेनेच स्थिर राहते.
13नीतिमत्तेची वाणी राजांना आनंद देणारी आहे, यथान्याय बोलणार्यावर ते प्रेम करतात.
14राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो.
15राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे.
16ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.
17दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो.
18गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.
19गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.
20जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य.
21जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो.
22ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय.
23ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.
24ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.
25मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.
26मजुराची क्षुधा त्याच्या हातून मजुरी करवते, कारण त्याचे तोंड त्याला ती करायला लावते.
27अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते.
28कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो.
29उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो.
30कुटिल कल्पना योजण्याला जो डोळे मिचकावतो व ओठ चावतो तो दुष्कर्म घडवून आणतो.
31पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;
32ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्यापेक्षा श्रेष्ठ होय.
33पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 16: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.