प्रकटी 12
12
स्त्री व अजगर
1नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा तार्यांचा मुकुट होता.
2ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’
3स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.
4त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्या स्त्रीपुढे उभा राहिला होता.
5सर्व ‘राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील’ असा पुत्र म्हणजे पुंसंतान ती प्रसवली; ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.
6ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.
7मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; ‘मीखाएल’ व त्याचे दूत अजगराबरोबर ‘युद्ध करण्यास’ निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले;
8तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही.
9मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.
10तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली,
“आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण,
त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या
ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत;
कारण आमच्या बंधूंना दोष देणारा,
आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप
करणारा, खाली टाकण्यात आला आहे.
11त्याला त्यांनी कोकर्याच्या रक्तामुळे व
आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले;
आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली
तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.
12म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्यांनो,
‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्यांवर
अनर्थ ओढवला आहे,
कारण सैतान आपला काळ थोडा आहे
हे ओळखून अतिशय संतप्त होऊन
खाली तुमच्याकडे आला आहे.”
13आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुंसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला.
14त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते.
15मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला;
16परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’
17तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;
18आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला.
सध्या निवडलेले:
प्रकटी 12: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.