YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 14

14
कोकरा व त्याचे अनुयायी
1नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;
2आणि ‘अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी’ व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत, अशी होती.
3ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.
4स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.
5त्यांच्या ‘तोंडात असत्य आढळले नाही;’ ते [देवाच्या राजासनासमोर] निष्कलंक आहेत.
तीन देवदूतांचे संदेश
6नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणार्‍यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती.
7तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”
8त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’
9त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,
10तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.
11त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”
12देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे.
13तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “लिही : प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.”
हंगाम व पृथ्वीची कापणी
14नंतर ‘मी पाहिले, तेव्हा’ पांढरा मेघ व त्या ‘मेघावर’ बसलेला ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणीएक ‘दृष्टीस पडला;’ त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता.
15तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, “तू आपला ‘विळा चालवून’ कापणी कर; कारण ‘कापणीची वेळ आली आहे;’ पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”
16तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला; आणि पृथ्वीची कापणी झाली.
17मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता.
18ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला; त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, “तू आपला तीक्ष्ण धारेचा ‘विळा चालवून’ पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्षे पिकली आहेत.”
19तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.
20‘ते द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडवले गेले;’ त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांना पोहचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.

सध्या निवडलेले:

प्रकटी 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन